(म्हणे) ‘कामसूत्रा’च्या भूमीत लैंगिकतेविषयी सामाजिक चर्चा करण्याला अश्‍लील समजले जाणे अयोग्य !’

‘माय म्यूस’ आस्थापनेच्या प्रमुखांचे भारतीय संस्कृतीच्या विरोधातील विधान

आमचे आस्थापन लैंगिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते !

मुंबई – भारतीय समाजातून लैंगिक संबंधांच्या संदर्भातील ‘अनैतिकता, लाज, अपराधाची भावना आणि भीती’ दूर करण्याची आवश्यकता आहे. भारतीय भूमी ही ‘कामसूत्रा’शी संबंधित असली, तरी लैंगिकतेविषयी सामाजिक चर्चा करण्याला अश्‍लील समजले जाते, हे अयोग्य आहे, असे मत अनुष्का आणि साहिल गुप्ता या जोडप्याने व्यक्त केले आहे. या जोडप्याने ‘माय म्यूस’ नावाचे आस्थापन चालू केले असून या माध्यमातून बनवण्यात येणारी लैंगिकतेशी संबंधित उत्पादने विकत घेणार्‍यांना अपमानास्पद वाटणार नाही, किंबहुना या उत्पादनांचा प्रथमच उपयोग करणार्‍यांना प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, माय म्यूस आस्थापन समाजात लैंगिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देत असून त्याचा लाभ शहरांतील तरुण पिढीला होत आहे. कोरोना काळात चालू झालेले हे आस्थापन आता देशातील २०० शहरांमध्ये लैंगिकतेशी संबंधित उत्पादनांची विक्री करते. लैंगिकतेचा पुरस्कार करणारी अनेक आस्थापने आज उदयास येत आहेत. लैंगिक संबंधांशी संबंधित व्यवसाय भारतात गतीने वाढत आहे, असेही त्यांनी म्हटले.

संपादकीय भूमिका

  • वात्स्यायन मुनींनी ‘कामसूत्र’ नावाचा जगप्रसिद्ध संस्कृत ग्रंथ लिहिला आहे. हिंदु धर्माने सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ हा एक पुरुषार्थच आहे; परंतु कामासारख्या भौतिक सुखात गुरफटण्यापेक्षा चिरंतन आनंद देणार्‍या मोक्षप्राप्तीसाठी मानवाने झटावे, असे हिंदु धर्म सांगतो ! आजच्या उच्छृंखल आणि पाश्‍चात्त्यांचा पगडा असलेल्यांना मात्र स्वैराचारच जवळचा वाटणार, यात काय आश्‍चर्य ?
  • आजही बहुतांश हिंदु समाज हा धर्माचरणी आहे. असे असतांना पश्‍चिमी विचारसरणी प्रसृत करू पहाणार्‍या प्रवृत्तींवर वेळीच वचक बसवण्यासाठी सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !