‘आय.एन्.एस्. वागशीर’ पाणबुडीचे जलावतरण !

जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट करण्याचे पाणबुडीचे वैशिष्ट्य

मुंबई, २० एप्रिल (वार्ता.) – प्रकल्प (प्रोजेक्ट) ७५ च्या अंतर्गत ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ येथे बांधण्यात आलेली स्कॉर्पियन वर्गातील सहावी पाणबुडी ‘आय.एन्.एस्. वागशीर’चे २० एप्रिल या दिवशी जलावतरण करण्यात आले. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत त्यांच्या पत्नी श्रीमती वीना अजय कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हा सोहळा पार पडला. ‘आय.एन्.एस्. वागशीर’ ही स्कॉर्पियन वर्गातील सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे.

या पाणबुडीत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही स्कॉर्पियन कलवरी वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी असून ती अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. अल्प आवाजात शत्रूची सहज दिशाभूल करण्याची क्षमता असलेल्या या पाणबुडीत १८ पाणतीर (‘टॉर्पिडो’) वाहून नेण्याची क्षमता आहे. या पाणबुडीतून एकाच वेळी ६ पाणतीर डागता येतात. तसेच जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट करण्याचेही या पाणबुडीचे वैशिष्ट्य आहे. ही पाणबुडी अधिक काळ पाण्याखाली राहून शत्रूचा वेध घेऊ शकते. खडतर चाचण्या झाल्यानंतरच ही पाणबुडी युद्धासाठी पूर्णपणे सिद्ध होणार आहे.