सातारा, १९ एप्रिल (वार्ता.) – मनुष्य या जीवनात परमात्मा पाहू शकतो. आत्मिक ज्ञान म्हणजेच अध्यात्मज्ञान अनुभवाने सिद्ध होते. परमात्मा निराकार, निर्गुण आहे. ऋषिमुनी, साधू-संत यांनी परमात्म्याला पाहिले आणि अनुभवले आहे. आपले सद्गुरु दीक्षेद्वारे आपल्याला प्रभूचे दर्शन घडवू शकतात; कारण आत्मा हा चेतन स्वरूपात असून तो परमेश्वराचा अंश आहे, असे प्रतिपादन ‘सावन कृपाल रुहानी मिशन’चे पुणे येथील प्रवचनकर्ता अधिवक्ता आनंदप्रकाश अग्रवाल यांनी केले. येथील श्री. प्रदीप भाटिया यांच्या निवासस्थानी १७ एप्रिल या दिवशी आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते.
अधिवक्ता आनंदप्रकाश अग्रवाल म्हणाले, ‘‘बाह्य आणि आंतरिक शांतीसाठी ध्यानमार्गाची आवश्यकता आहे. परमात्म्याच्या चेतन संपर्कानेच आपल्याला मानसिक शांतता लाभू शकते. सर्वांशी प्रेमपूर्वक आणि निष्काम व्यवहार केले पाहिजेत.’’
सत्संग सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वश्री तेजस भाटिया, संजय भाटिया, धर्मा गंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.