आता राज्यात वीजदेयकांसाठी ‘प्रीपेड कार्ड’ आणण्याचा विचार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

बारामती (पुणे) – राज्यात कोळशाच्या संकटामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पर्यायाने भारनियमन करावे लागत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केला जात आहे; मात्र लोकांनी वापरलेल्या विजेचे देयक भरणेही आवश्यक आहे. सध्या वीजचोरीचे प्रमाण वाढत असल्याने राज्य सरकार ‘प्रीपेड कार्ड’चा पर्याय आणत आहे. जशी गरज असेल तसे कार्ड ‘रिचार्ज’ करून विजेचा वापर करावा, असा पर्याय आणण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्दमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘आम्ही कोळसा परदेशातून आयात करण्याचा प्रयत्न केला; पण आपल्या वीजनिर्मिती प्रकल्पात परदेशी कोळसा चालत नाही. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून अधिक पैसे देऊन वीज घेण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र सध्या देशामध्ये विजेची टंचाई निर्माण झाली आहे. आता वीजचोरी (आकडा) बंद करावी लागेल. आकड्यांमुळे सरकारची वाट लागली आहे. लोकांना चांगली सेवा पाहिजे असेल, तर मानसिकतेमध्ये पालट करावा लागेल. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विजेचा प्रश्‍न सोडवावा लागेल.’’