लडाखमध्ये चीनची पुन्हा कुरापत : नियंत्रणरेषेजवळ ३ भ्रमणभाष मनोरे उभारले !

  • भारतावर पाळत ठेवण्याचा चीनचा प्रयत्न !

  • सीमेलगत असलेल्या भारतीय गावांत ‘४ जी’ची सुविधा नाही !

  • सीमेजवळ भारतीय हद्दीत १, तर चीनमध्ये ९ मोबाईल टॉवर !

कुरापतखोर चीनला समजेल अशा भाषेत उत्तर दिल्यास तो ताळ्यावर येईल, हे लक्षात घेऊन भारताने आक्रमक भूमिका अवलंबणे आवश्यक ! – संपादक

नवी देहली – नियंत्रणरेषेजवळ लागून असलेल्या ‘हॉट स्प्रिंग’मध्ये चीनने ३ भ्रमणभाष मनोरे (मोबाईल टॉवर) उभारले आहेत. लडाखच्या चुशूल प्रदेशाचे नगरसेवक कोंचोक स्टॅनझिन यांनी सामाजिक माध्यमांद्वारे ही माहिती दिली. कोंचोक म्हणाले की, चीन सीमेजवळ भ्रमणभाष मनोरे उभारत आहे, ही भारतासाठी चांगली बातमी नाही. चीन आधीच भारताची भूमी बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. भारताच्या हद्दीत पाळत ठेवण्यासाठी चीन या मनोर्‍यांचा वापर करू शकतो.

कोंचोक पुढे म्हणाले की,

१. चीनने त्याच्या कारवायांना अजूनही आवर घातलेला नाही. पूर्वी चीनने पँगॉन्ग सरोवरावर पूल बांधला होता आणि आता त्याने गरम पाण्याच्या झर्‍यात तीन भ्रमणभाष मनोरे उभारले आहेत. ही चिंतेची गोष्ट नव्हे का ?

२. भारत-चीन सीमेला लागून असलेल्या भारतातील गावांमध्ये ‘४ जी’ची सुविधा नाही. मी रहातो त्या भागातील ११ गावांमध्ये ‘४ जी नेटवर्क’ नाही.

सीमेजवळील भागात विकास नाही !

‘सीमेला लागून असलेल्या भागाच्या विकासाकडे लक्ष न दिल्याने आपण मागे पडत आहोत. आपल्याकडे केवळ एक मोबाईल टॉवर आहे, तर चीनमध्ये ९ टॉवर आहेत, अशी माहिती कोंचोक यांनी दिली.