बारामती (पुणे) – देहलीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीमध्ये रात्री काही अपप्रकार घडले. सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपापले सण आनंदाने, उत्साहाने साजरे केले पाहिजेत. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन कुणाकडून होऊ नये, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते १७ एप्रिल या दिवशी बारामती येथे विविध विकासकामांच्या पहाणी दौऱ्यावर असतांना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला महत्त्व द्यावे. ते कसे सोडवता येतील, ते पहावे. जुन्या विषयांमध्ये लोकांना गुंतवून त्यांच्या भावना भडकावणे आणि संभ्रमावस्था निर्माण करण्याची ही वेळ नाही. प्रसारमाध्यमांनीही आता हे अल्प करावे आणि विकासाच्या कामांना महत्त्व द्यावे.’’ विकासकामांना आणि राज्यासमोर, देशासमोर असणाऱ्या प्रश्नांना महत्त्व द्या, असा सल्लाही पवार यांनी दिला.