भ्रष्टाचाराने पोखरलेली शैक्षणिक व्यवस्था ! – संपादक
कृषी साहाय्यक नोकरभरती परीक्षेतील घोटाळ्यात सहभागींना कायमचे निलंबित करा ! – संपादक |
उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्यास सांगितल्याप्रकरणी आमदार विप्लव बाजोरिया यांची तक्रार
अकोला – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत १० एप्रिल या दिवशी घेण्यात आलेल्या कृषी साहाय्यक नोकरभरतीच्या परीक्षेत अपव्यवहार झाल्याची तक्रार कृषी विभागाच्या सचिवांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि आमदार विप्लव बाजोरिया यांनी तक्रार केली आहे. परीक्षेच्या वेळी काही परीक्षार्थींनी उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवल्या. त्यामुळे ‘या परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि अपप्रकार दिसून येतो’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
विद्यापिठाच्या अंतर्गत कृषी साहाय्यक पदाच्या ५१ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ६ सहस्रांच्या जवळपास विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी सरासरी ४० टक्के परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली.
तक्रारीत म्हटले की, बऱ्याच परीक्षार्थींनी उत्तरपत्रिका सोडवल्या; मात्र काही ठराविक परीक्षार्थींना कोऱ्या उत्तरपत्रिका ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. ज्या परीक्षार्थ्यांना ‘मेरीट’मध्ये उत्तीर्ण करायचे आहे, त्यांना कोऱ्या उत्तरपत्रिका ठेवण्यास सांगण्यात आले, म्हणजे पडताळणीच्या वेळी त्या भरून घेता येतील. त्यामुळे या परीक्षेचा निकाल चौकशीनंतर लावावा, तसे आदेशही विद्यापीठ प्रशासनास द्यावेत.
या तक्रारीवर कार्यकारी परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखडे आणि विठ्ठल सरप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यानंतर कृषी विद्यापिठाच्या कुलसचिवांना सहसंचालक, कृषी परिषद, पुणे यांनी पत्र पाठवून या प्रकरणी स्वयंस्पष्ट आणि वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.