रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील लावलेल्या माहिती फलकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले आश्‍चर्यकारक पालट !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ‘सनातन प्रभात’चे कार्यालय असलेल्या चैतन्यमय वास्तूत लावलेल्या माहिती फलकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले आश्‍चर्यकारक पालट !

सर्वांना धर्मशिक्षण देऊन राष्ट्र अन् धर्म यांसाठी कृतीशील करणे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित करणे, असे ध्येय ठेवून ‘सनातन प्रभात’ गेली २३ वर्षे कार्य करत आहे. अशा ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांची सेवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह सद्गुरु आणि संत यांचे वास्तव्य असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ चालू आहे. आश्रमातील ‘सनातन प्रभात’च्या या कार्यालयाचे फेब्रुवारी २०१९ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. येथे केवळ नूतनीकरण करण्यात आले नाही, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने या कार्यालयाचे चैतन्यमय अन् पवित्र वास्तूत रूपांतर झाले. या वास्तूत ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये आणि अन्य माहिती असलेला एक फलकही लावण्यात आला. या फलकावर मध्यभागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी हा फलक या वास्तूत लावण्यात आला, त्याच दिवशी या छायाचित्रात पुढीलप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण पालट दिसून आले.

श्री. भूषण केरकर

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे आणि त्यामुळे ते छायाचित्र कोणत्याही बाजूने पाहिले, तरी ते आपल्याकडेच पहात असल्याचे लक्षात येणे

या फलकावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे लिखाण करतांनाचे छायाचित्र आहे. या छायाचित्राकडे कोणत्याही बाजूने (फलकाच्या समोरून, डावीकडून आणि उजवीकडून) पाहिले असता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संपूर्ण शरीर, तसेच त्यांच्या हातातील लेखणी आणि लिहिण्यासाठी कागद लावलेले पॅड हे सर्व पूर्णपणे आपल्या दिशेने फिरत आहे, तसेच परात्पर गुरुदेव हे आपल्याकडेच पहात आहेत’, असे जाणवते.

माहिती फलक डावीकडून पाहिल्यावर दिसणारे परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र
माहिती फलकाच्या समोर मध्यभागी उभे राहून पाहिल्यावर दिसणारे परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र
माहिती फलक उजवीकडून पाहिल्यावर दिसणारे परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र

(छायाचित्रातील वायुतत्त्वरूपी चैतन्याचे प्रक्षेपण वाढले की, छायाचित्र अधिक जिवंत वाटू लागते. त्यातील तेजतत्त्वाचे प्रक्षेपण वाढले की, ते अधिक तेजस्वी दिसते; परंतु वायुतत्त्वाच्या आधारे मात्र ते अधिक जिवंत होते, म्हणजेच ‘प्रत्यक्षातच ते आहेत’, इतके ते सजीव होते. – एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या नावानेही लिखाण करतात. (३.१.२०१२))

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टर हे स्वतःच ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून सूक्ष्मातून सर्व कार्य करत असल्याचे सांगणे

वर्ष २०१९ मध्ये हे छायाचित्र पाहून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘फलकावरील छायाचित्रात परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातातील लेखणीही हालत असल्याचे जाणवते. म्हणजे परात्पर गुरु ‘सनातन प्रभात’साठी लिखाण करत आहेत आणि तेच ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून सूक्ष्मातून सर्व कार्य करत आहेत.’’ ‘सनातन प्रभात’च्या वास्तूतही शांतीची अनुभूती येत असल्याचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगितले.

३. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या वास्तूत ध्यानमंदिराएवढे चैतन्य निर्माण होणे

नूतनीकरणानंतर ‘सनातन प्रभात’च्या वास्तूविषयी परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘ध्यानमंदिरात जेवढे चैतन्य आहे, तेवढेच चैतन्य ‘सनातन प्रभात’च्या वास्तूतही निर्माण झाले आहे.’’ खरे म्हणजे वास्तूत असे चैतन्य निर्माण होणे, ही परात्पर गुरुदेवांचीच कृपा आहे.

या वास्तूत ‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक, तसचे आश्रमात वास्तव्यास असणारे आणि आश्रमात काही कालावधीसाठी येणारे संत अन् साधक यांना या वास्तूत आल्यावर चैतन्याच्या स्तरावरील अनुभूती येत आहेत.

‘परात्पर गुरुदेव, तुमच्या कृपेमुळेच आम्हा सर्व साधकांना चैतन्यमय वास्तूत ‘सनातन प्रभात’ची सेवा करण्याची आणि त्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची संधी लाभली आहे, यासाठी आम्ही तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत !’

‘हे गुरुदेव, तुमच्या कृपेने लाभलेल्या चैतन्यमय वास्तूत आम्हा सर्व साधकांकडून ‘सनातन प्रभात’ची सेवा एकाग्रतेने, परिपूर्ण आणि भावपूर्ण रितीने होऊ दे अन् त्या माध्यमातून आमची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होऊ दे, तसेच तुमच्या कृपेने वास्तूत निर्माण झालेल्या चैतन्यातही उत्तरोत्तर वाढ होत राहू दे. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म जागृतीचे व्यापक कार्य होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे’, हीच तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे !’

– श्री. भूषण केरकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह (११.४.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.