हिंदू सेनेने जेएनयू बाहेर लावले भगवे ध्वज आणि ‘भगवा जेएनयू’ लिहिलेली भित्तीपत्रके !

नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (‘जेएनयू’मध्ये) श्रीरामनवमीच्या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि साम्यवादी विद्यार्थी संघटना यांच्या विद्यार्थ्यांमध्ये पूजा अन् मांसाहार यांवरून हाणामारी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आता जेएनयूच्या बाहेरील रस्त्यावर आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ भगवे झेंडे अन् भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. या भित्तीपत्रकांवर ‘भगवा जेएनयू’ असे लिहिले आहे. ही भित्तीपत्रके आणि झेंडे हिंदू सेनेने लावल्याचे सांगण्यात येत आहे.

१. याप्रकरणी हिंदू सेनेचे उपाध्यक्ष सुरजित यादव यांनी म्हटले आहे की, जेएन्यूमध्ये विरोधकांकडून भगव्याचा अपमान करण्यात आला होता. या लोकांनी सुधारावे. भगव्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमचा आदर करतो. प्रत्येक धर्माचा आणि विचारांचा आदर करा. भगव्या रंगाचा ज्या प्रकारे अपमान केला जात आहे, तो हिंदू सेना सहन करणार नाही.

२. याविषयी देहली (दक्षिण पश्‍चिम) विभागाचे पोलीस उपायुक्त मनोज सी. यांनी सांगितले की, जेएनयूच्या आजूबाजूला रस्त्यावर काही झेंडे आणि भित्तीपत्रके लावण्यात आल्याचे आमच्या पहाण्यात आले आहे. ते त्वरित काढून टाकण्यात आले आहेत आणि योग्य कायदेशीर कारवाई केली जात आहे.