२०.२.२०२२ या दिवशी उडुपी (कर्नाटक) येथील साधक श्री. सोमनाथ मल्ल्या आणि सौ. प्रीती मल्ल्या यांचा मुलगा कु. जयंत मल्ल्या (वय ११ वर्षे) याचा उपनयनविधी झाला. या विधीचे देवाने माझ्याकडून सूक्ष्मातील परीक्षण करवून घेतले. ते पुढे दिले आहे.
१. उपनयनविधीच्या सभागृहाजवळच असलेल्या जागृत मंदिरातील चैतन्याच्या प्रक्षेपणाने विधीत पुष्कळ आनंद जाणवणे आणि मंदिर परिसरात धार्मिक विधी करण्याचे महत्त्व लक्षात येणे
उपनयनविधीचे आयोजन लक्ष्मीव्यंकटेश मंदिराच्या परिसरातील एका सभागृहात करण्यात आले होते. लक्ष्मीव्यंकटेश आणि तेथील अन्य देवांच्या मूर्ती जागृत असून त्यांतून आजूबाजूच्या परिसरात पुष्कळ प्रमाणात चैतन्याचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे उपनयनाच्या कार्यक्रमात पुष्कळ सात्त्विकता जाणवून माझ्या मनाला आनंद जाणवत होता. तेव्हा धार्मिक विधी मंदिर परिसरात करण्याचे महत्त्व लक्षात आले.
२. विधीच्या आरंभी यजमानांनी लक्ष्मीव्यंकटेशाला प्रार्थना करणे
उपनयनविधी लक्ष्मीव्यंकटेश मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. विधीच्या आरंभी लक्ष्मीव्यंकटेश मंदिरात जाऊन श्री. सोमनाथ यांनी त्यांच्या कुटुंबियांसह ‘उपनयनविधी निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी एकत्रित प्रार्थना केली आणि लक्ष्मीव्यंकटेशाला एका ताटात फुले अन् नारळ इत्यादी अर्पण करण्यात आले. याप्रसंगी पुरोहितांचे मंत्रोच्चार चालू होते.
२ अ. सूक्ष्मातील परीक्षण – लक्ष्मीव्यंकटेशाच्या मूर्तीतून सूक्ष्मातून श्रीविष्णूचा एक गण बाहेर येणे आणि त्याने यजमानांनी अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारून लक्ष्मीव्यंकटेशाला अर्पण करणे : त्या वेळी लक्ष्मीव्यंकटेशाच्या, म्हणजेच श्रीविष्णूच्या मूर्तीतून सूक्ष्मातून एक ‘पुरुष गण’ गाभाऱ्यातून बाहेर आला आणि त्याने श्री. सोमनाथ यांच्या ताटातील फुले आणि नारळ इत्यादी साहित्य स्वीकारले. त्यानंतर पुरुष गणाने ते लक्ष्मीव्यंकटेशाच्या चरणी समर्पित केले. त्या वेळी त्याने अर्पण केलेल्या वस्तू अदृश्य झाल्या आणि तो गण ‘लक्ष्मीनारायच्या चरणांत विलीन झाला आहे’, असे मला दृश्य दिसले. त्या गणाला श्रीविष्णूचा ‘चरणसेवक’ किंवा ‘विष्णुगण’, असे म्हणतात. देवाकडे त्याचे विविध कार्य करण्यासाठी सूक्ष्मातून अनेक गण असतात. मनुष्याचे देवाशी संपर्क साधण्याचे माध्यम, म्हणजे ‘देवाचे गण’ होय.
२ आ. प्रार्थना करतांना पुरोहितांनी मंत्रोच्चार करणे
२ आ १. सूक्ष्मातील परीक्षण – मंत्रांमुळे वातावरणात पाण्याच्या कारंज्याप्रमाणे दैवी कणांची निर्मिती होणे : लक्ष्मीव्यंकटेश मंदिरात श्री. सोमनाथ यांनी त्यांच्या कुटुंबियांसह ‘बटूचा (कु. जयंतचा) उपनयनविधी निर्विघ्नपणे पार पडावा’, यासाठी प्रार्थना केली. त्या वेळी पुरोहित मंत्रोच्चार करत होते. या मंत्रांमुळे वातावरणात पाण्याचे कारंजे उडतांना दिसतात, त्याप्रमाणे सोनेरी, लाल आणि निळ्या रंगांच्या दैवी कणांची निर्मिती होतांना दिसली. त्यामुळे मंदिरातील वातावरण आणखी सात्त्विक बनले होते.
३. उपनयनात करण्यात आलेले धार्मिक विधी
३ अ. गंगापूजन
३ अ १. सूक्ष्मातील परीक्षण – पाण्यात गंगामातेचे सूक्ष्मातून दर्शन होणे : बटूच्या (जयंतच्या) आई-वडिलांनी एका कलशातील पाण्याचे, म्हणजे गंगेचे पूजन केले. त्या वेळी सूक्ष्मातून ‘पांढऱ्या वस्त्राची साडी नेसलेली एक देवी तेथे उपस्थित आहे’, असे मला दृश्य दिसले. त्या वेळी ‘ती साक्षात् गंगामाता आहे’, असा विचार माझ्या मनात आला. तिला बटूचे आई – वडील भावपूर्ण फुले अर्पण करायचे, तेव्हा ती फुले गंगादेवीच्या चरणांवर सूक्ष्मातून पडलेली आहेत, असे मला दिसायचे.
३ आ. उडीद विधी : हा विधी केवळ गौड सारस्वत ब्राह्मणांमध्ये करतात. यात बटूने जात्यात (धान्य दळण्यासाठी दगडापासून बनवलेल्या साधनात) उडीद आणि मूग ही धान्ये बारीक करायची असतात. ही धान्ये शरिराला शक्ती आणि पुष्टी देणारी आहेत. जात्यात बारीक झालेल्या धान्याचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण केला जातो. जाते दळण्याची कृती आई बटूला मांडीवर घेऊन शिकवते. उपनयन झाल्यावर बटू ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करतो. धान्य बारीक करण्याची कृती शिकवून आई बटूवर स्वावलंबनाचा संस्कार करते.
३ आ १. सूक्ष्मातील परीक्षण
अ. बटू जात्यात धान्य दळतांना जात्याच्या मध्यभागी असलेल्या लाकडी खुंट्यातून ब्रह्मांडातून ईश्वरी तत्त्व खेचले जायचे आणि ते धान्याच्या पिठात मिश्रित व्हायचे.
आ. धान्य बारीक करून त्याच्या पिठातून बनवलेल्या पदार्थाचा देवाला नैवेद्य करायचा असतो. यातून बटूवर ‘आता प्रत्येक कृती देवासाठी करायची आहे’, हा संस्कार केला जातो.
३ इ. नवग्रह शांती
३ इ १. सूक्ष्मातील परीक्षण – हवनातून निर्माण होणाऱ्या दैवी ऊर्जेतून यजमानांच्या कुळातील दोष नष्ट होणे : नवग्रहांसाठी हवन चालू झाल्यावर त्यातून अधूनमधून दैवी ऊर्जा प्रकट व्हायची आणि ती दूर अंतरावर जाऊन, आकाशात फटाक्याचा बाण वेगाने वर जाऊन त्याचा स्फोट होऊन प्रकाश दिसतो, त्याप्रमाणे दैवी ऊर्जेतून प्रकाश प्रस्फुटित झाल्याचे दृश्य मला दिसायचे. या प्रक्रियेतून बटूच्या कुळातील काही दोष नष्ट व्हायचे. हे दृश्य मला हवनाच्या कालावधीत २ – ३ वेळा दिसले.
३ ई. चौल संस्कार (बटूच्या डोक्यावरील केस काढणे)
३ ई १. सूक्ष्मातील परीक्षण – बटूच्या डोक्यावरील केस शास्त्रशुद्ध पद्धतीने काढल्यावर बटूला ब्रह्माकडे जाण्यासाठी आवश्यक असलेले विचार ग्रहण करण्याची क्षमता आणि प्रेरणा प्राप्त होत असणे : चौल संस्कारात बटूच्या डोक्याच्या मागील बाजूस गोल आकारात काही केस ठेवून बटूचे उर्वरित केस काढले जातात. तसे केल्यावर बटूच्या डोक्यावर ‘स्प्रिंगच्या आकाराच्या पांढऱ्या रंगाच्या दैवी लहरी निर्माण झाल्या आहेत’, असे मला दिसले. या दैवी लहरींमुळे बटूची बुद्धी शांत आणि स्थिर होण्यास साहाय्य होते.
‘बटूच्या डोक्याच्या मध्यभागी गोल आकारात ठेवलेल्या केसांद्वारे ब्रह्मांडातील पांढऱ्या आणि लाल रंगांच्या दैवी लहरी एकत्रित खेचल्या जात आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्यांना ‘ब्रह्मलहरी’ किंवा ‘देवलहरी’, असे म्हणतात. या दैवी लहरींमुळे बटूला ब्रह्माकडे जाण्यासाठी आवश्यक असलेले विचार ग्रहण करण्याची क्षमता आणि प्रेरणा प्राप्त होते.
३ उ. बटूच्या अंगाला गोपीचंदन लावणे
३ उ १. सूक्ष्मातील परीक्षण – बाह्य अंगाची शुद्धी होऊन बटू अधिक तेजस्वी दिसणे : गोपीचंदन लावल्याने बटूच्या बाह्य अंगाची शुद्धी होते. त्याच्या अंगावरील रज-तमाची मलिनता दूर होऊन त्याला सात्त्विकता प्राप्त होते. पुरोहितांनी जयंतच्या शरिराला गोपीचंदन लावल्यावर तो अधिक तेजस्वी दिसत होता.
३ ऊ. अंतर्संस्कार हवन : धर्मशास्त्रानुसार संस्काराचे ‘बहिर्संस्कार’ आणि ‘अंतर्संस्कार’ हे दोन प्रकार आहेत. आई बटूवर संस्कार करते ते ‘बहिर्संस्कार’ होय आणि बटूवर हवनाद्वारे संस्कार केले जातात त्याला ‘अंतर्संस्कार’, असे म्हणतात. त्यासाठी पुरोहितांनी हवन केले.
३ ऊ १. सूक्ष्मातील परीक्षण
अ. हवनातून पांढऱ्या रंगाच्या सूक्ष्म ऊर्जेचा पांढरा धागा दिसतो, त्याप्रमाणे ऊर्जा प्रकट होऊन ती जयंतच्या हृदयाशी जोडलेली दिसली. त्या वेळी ‘बटू अग्निनारायणाशी सूक्ष्मातून जोडला गेल्याचे हे दर्शक आहे’, असे मला जाणवले. हा शुद्ध अग्नी बटूच्या शरिराला आणि आध्यात्मिक जीवनाला पूरक बनून साथ देतो. यासाठी बटूने नेहमी सदाचरण, म्हणजे धर्माचरण करणे महत्त्वाचे असते.
आ. हवनातून दैवी लाल ऊर्जा प्रकट होऊन ती बटूच्या हृदयात प्रवेश करतांना दिसली. या दैवी ऊर्जेने बटूच्या मनातील रज-तम काही प्रमाणात न्यून होऊन त्याची शुद्धी होण्याचे कार्य घडते.
३ ए. बटूला यज्ञोपवित (जानवे) घालणे
३ ए १. सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान – बटूला जानव्यातून ‘गायत्री’ आणि ‘ब्रह्म’ यांची एकत्रित शक्ती प्राप्त होणे : पुरोहितांनी जयंतला जानवे घातल्यावर त्याला ‘लाल रंगाची प्रकट शक्ती प्राप्त झाली आहे’, असे मला जाणवले. या प्रगट शक्तीत ‘गायत्री’ आणि ‘ब्रह्म’ यांची एकत्रित शक्ती असते. गायत्री शक्ती बटूच्या बुद्धीची ‘प्रगल्भता’ आणि ‘तेज’ यांत वृद्धी करते आणि ब्रह्माची शक्ती बटूच्या चंचल मनाला नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात साहाय्यभूत ठरते. जानव्याला ‘धर्मबंधन’, असे म्हटले आहे. बटूला नेहमी ‘धर्म आणि त्याचे आचरण’ यांचे स्मरण व्हावे, यांसाठी ‘बटूने जानवे परिधान करणे’, हे धर्माने सांगितले आहे.
३ ऐ. बटूला कौपीन (लंगोट) नेसवणे : उपनयनापासून बटूने स्वतःच्या कमरेला अन्य वस्त्राऐवजी कौपीन (लंगोट) नेसायचा असतो.
३ ऐ १. सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान – बटूसाठी लंगोट ‘कामवासनेची बाधा न होणे, संयमी जीवन जगता येणे आणि ज्ञानार्जन ग्रहण करतांना एकाग्रता साध्य होणे’, यांसाठी साहाय्यभूत ठरणे : पूर्वीच्या काळी मुलाचे ८ व्या वर्षी उपनयन झाल्यावर तो वेद आणि अन्य विद्यांचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी स्वतःचे घर सोडून गुरूंच्या आश्रमात काही काळ रहायला जायचा. बटूचे वय वाढू लागल्यावर गुरूंकडून ज्ञान ग्रहण करतांना ‘कामवासनेची बाधा होऊ नये, संयमी जीवन जगता यावे आणि ज्ञानार्जन ग्रहण करतांना एकाग्रता साध्य व्हावी’, यांसाठी बटूने कमरेला लंगोट नेसण्याची पद्धत सनातन धर्मात सांगितलेली आहे.
लंगोट नेसतांना पुरुषाचे लिंग मोकळे न रहाता कापडात व्यवस्थित आणि घट्ट गुंडाळले जाते. त्यामुळे लिंगाचा बाह्य वातावरणाशी संपर्क येत नाही आणि कामवासनेला उत्तेजना मिळत नाही. परिणामी बटूचे मन ज्ञान ग्रहण करतांना एकाग्र होण्यास साहाय्य होते. ही व्यवस्था बटूच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पूरक अशी आहे.
४. उपनयनविधी पूर्ण झाल्यावर जयंतचे शरीर तेजोमय दिसत होते. त्याच्यामागे सूक्ष्मातून पांढऱ्या रंगाचा प्रकाश दिसत होता. हे धर्मतेजाचे प्रतीक आहे.
५. उपनयन संस्काराच्या आध्यात्मिक महत्त्वाविषयी सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उपनयन संस्काराद्वारे बटूची ज्ञानार्जन करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता होत असणे : प्राचीन काळी बटू ८ व्या वर्षी उपनयन झाल्यावर वेदाध्ययनासाठी काही काळ गुरुगृही रहात असे. उपनयन झाल्यावर बटूचा ब्रह्मचार्याश्रम चालू होत असे. बटूसाठी गुरूंकडून ज्ञानाजर्नासाठीचा हा उत्तम काळ असतो. त्याला हे सहज साध्य व्हावे, यासाठी आवश्यक असणारे मनोबळ आणि आध्यात्मिक बळ उपनयन संस्काराद्वारे बटूला प्राप्त होते. उपनयनाच्या वेळी बटूला पुढील जीवन जगण्यासाठी धर्माने काही नियम सांगितले आहेत, उदा. बटूने ज्ञानार्जनासाठी गुरुगृही रहाणे, प्रतिदिन त्रिकाल संध्या करणे, समाजात जाऊन भिक्षा मागणे इत्यादी. या नियमांचे पालन केल्याने बटूला अल्प कालावधीत व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनासाठी सक्षम स्थिती प्राप्त होते. धर्माने बटूला केवळ नियम न सांगता त्यासाठी आवश्यक असलेली त्याची स्थूल आणि सूक्ष्म अशी सर्वांगीण पूर्वसिद्धता उपनयन संस्काराद्वारे करवून घेतली आहे. यावरून सनातन धर्म आणि त्याचे महत्त्व धर्मग्रंथांतून विशद करणाऱ्या ऋषींचे माहात्म्य लक्षात येते.
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२२)
|