केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

माकप पक्षाकडून मात्र समर्थन !

यावरून माकपचा ‘लव्ह जिहाद’ला पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते. हे केरळमधील ख्रिस्त्यांना, चर्चसंस्थेला मान्य आहे का ? हे त्यांनी उघडपणे सांगितले पाहिजे ! – संपादक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमधील ‘डोमॅस्टीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’ या साम्यवादी संघटनेचे (डी.व्हाय.एफ.्आय.चे) मुसलमान नेते एम्.एस् शीजीन यांनी ज्योत्सना या ख्रिस्ती तरुणीशी विवाह केल्याने कोडेंचेरी जिल्ह्यामधील सामाजिक स्थिरतेला बाधा पोचली आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) नेते जॉर्ज एम्. थॉमस यांनी केले होते. त्यावरून आता माकपने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. माकपचे कोझिकोडे जिल्हाचे सचिव पी. मोहनलाल यांनी म्हटले, ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार नसतो. हा संघ परिवाराच्या धोरणाचा एका भाग आहे ज्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. जॉर्ज एम. थॉमस यांनी नकळत ते वक्तव्य केले. त्यांना त्यांची चूक समजली आहे.’

१. ज्योत्सना आणि शीजीन यांचा विवाह ९ मार्च या दिवशी झाल्यानंतर स्थानिक ख्रिस्त्यांनी आंदोलने केली. यामुळेच हे दोघेही भूमिगत झाल्यासारखे लपून होते. स्थानिकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून ज्योत्सना हिचा शोध घेण्याची मागणी केली. मुलीच्या पालकांनीही वेगळी तक्रार केली.

२. थॉमस यांनी या विवाहाविषयी म्हटले होते की, या तरुणीच्या पालकांसमवेत पक्षाच्या संवेदना कायम आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये शीजीनने चुकीची भूमिका घेतली. शीजीन यांनी विवाहाविषयी आधीच कळवले असते, तर पक्षाने आधीच पाठिंबा दिला असता. अशाप्रकारे त्यांनी पळून जायला नको होते. यामुळे या प्रदेशातील ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखवल्या आहेत.

३. डी.व्हाय.एफ्.आय.ने थॉमस यांच्या वक्तव्याच्या विरोधात भूमिका घेत एक पत्रक जारी केले. यात म्हटले की, नेत्याच्या विवाहावरून चालू असणारा वाद दुर्देवी आणि आवश्यकता नसतांना निर्माण केला आहे. हे लग्न या दोघांचा खासगी निर्णय आहे. आमच्या पक्षाचा या दोघांनाही पाठिंबा आहे.