‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने ‘श्रीरामनवमी ते हनुमान जयंती’ (२१ ते २७.४.२०२१) या कालावधीत स्वरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत ‘बलोपासना वर्ग सप्ताह’ घेण्यात आला होता. या ‘ऑनलाईन बलोपासनावर्गा’च्या माध्यमातून भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम आम्हाला अनुभवता आला. देवाच्या कृपेने हा ‘ऑनलाईन बलोपासनावर्ग सप्ताह’ घेण्याची कल्पना कशी सुचली ? बलोपासना वर्गाची रूपरेषा, बलोपासनावर्गाचा धर्मप्रेमी आणि प्रशिक्षणसेवक यांना झालेला लाभ अन् या वर्गाच्या माध्यमातून शिकायला मिळालेली सूत्रे’ श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. श्रीरामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत पृथ्वीवर पुष्कळ प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीराम आणि हनुमान यांच्या तत्त्वाचा लाभ करून घ्यावा’, असा विचार मनात येणे अन् त्याविषयी सहसाधकांना सांगितल्यावर ‘बलोपासनावर्ग सप्ताह’ घेण्याचे निश्चित होणे : श्रीरामनवमीच्या ३ – ४ दिवस आधी माझ्या मनात विचार आला, ‘श्रीरामनवमी ते हनुमानजयंती या कालावधीत पृथ्वीवर श्रीराम आणि हनुमान यांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे या कालावधीचा आपण स्वरक्षण प्रशिक्षण सेवेच्या दृष्टीने लाभ करून घ्यायला पाहिजे. समर्थ रामदासस्वामींनी ११ ठिकाणी मारुति मंदिरांची स्थापना करून हिंदवी स्वराज्याला शक्तीसह भक्तीचेही बळ दिले होते. या कालावधीत उपासना केल्यास आपल्यालाही बळ प्राप्त होईल.’ माझ्या मनातील हे विचार देवाच्या कृपेने मी सत्संगात सांगितले. सत्संगातील सहसाधकांना हे विचार आवडले आणि ‘श्रीरामनवमी ते हनुमान जयंती’ या कालावधीत ‘ऑनलाईन’ ‘बलोपासनावर्ग सप्ताह’ घेण्याचे निश्चित झाले.
श्री गुरूंची कृपा आणि प्रशिक्षणसेवक यांचे प्रयत्न यांमुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील ५८० हून अधिक धर्मप्रेमींनी या ‘ऑनलाईन बलोपासनावर्ग’ सप्ताहाचा नियमितपणे लाभ घेतला.
२. बलोपासना वर्गाची रूपरेषा
२ अ. वेळ : सकाळी ६ ते ७
२ अ १. वर्गाच्या प्रारंभी : १० मिनिटे – ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप घेणे
२ अ २. शारीरिक प्रशिक्षण : ३५ मिनिटे (प्रशिक्षणामध्ये थोडा वेळ श्रीराम आणि हनुमान यांच्या जीवनातील शौर्याचा प्रसंग सांगणे)
२ अ ३. मनोगत : ५ मिनिटे
२ अ ४. ‘श्री हनुमते नमः ।’ नामजप १० मिनिटे
२ आ. बलोपासनावर्ग घेण्याची ठरवलेली वेळ ही हनुमंताची जन्मवेळ असल्याचे नंतर लक्षात येणे आणि ‘ही वेळ निश्चित होणे’, हे देवाचेच नियोजन आहे’, असे जाणवल्याने पुष्कळ कृतज्ञता वाटणे : ‘बलोपासनावर्गाची वेळ काय ठेवूया ?’, याविषयी विचार करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘वर्गाची वेळ सकाळची ठेवूया, म्हणजे सर्वांना या बलोपासनेचा लाभ होईल.’ त्यानुसार सत्संगात सर्वानुमते सकाळी ६ ते ७ अशी वेळ निश्चित करण्यात आली. ही वेळ निश्चित झाल्यावर ‘हनुमानाची जन्मवेळ सकाळी ६ वाजता आहे’, हे आमच्या लक्षात नव्हते; परंतु हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी आमच्या ही गोष्ट लक्षात आली. त्या वेळी माझ्या मनात विचार आले, ‘बलोपासनावर्ग’ घेणे हे देवाचेच नियोजन आहे आणि देवानेच या वर्गाची वेळ सकाळी ६ वाजता ठेवण्याचे आम्हाला सुचवले, तसेच या वर्गाच्या माध्यमातून देवाला त्याची शक्ती सर्वांना प्रदान करायची आहे.’ अन्य वेळी समष्टीसाठी कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास आम्ही संध्याकाळची वेळ ठरवतो; परंतु या वेळी देवानेच आम्हाला सकाळी वर्ग घेण्याचे सुचवले. त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. ‘ऑनलाईन’ बलोपासनावर्ग सप्ताह’ घेण्याचे ठरल्यानंतर सिंधुदुर्ग येथील प्रशिक्षण सेविका कु. पूजा धुरी हिला स्फुरलेले काव्य
चला साथी हो, करू सिद्धता बलोपासनेची ।
श्रीरामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह बलोपासनेचा ।
शक्तीची उपासना करूनी घेऊ आनंद क्षणोक्षणीचा ।। १ ।।
प्रीतीच्या धाग्याने क्षात्रतेजाच्या पताका फडकवूया ।
श्रीरामाची कृपा अनुभवण्यास तळमळीने सेवा करूया ।। २ ।।
परशुरामाच्या पावन भूमीत संघभावाने राहूया ।
चैतन्यशक्ती अनुभवण्या क्षात्रभाव जागृत करूया ।। ३ ।।
‘बलोपासना सप्ताहा’त धर्मप्रेमींना सहभागी करून घेऊया ।
श्रीरामाचा पाळणा हृदयमंदिरी सजवूया ।। ४ ।।
शरणागतीच्या दीपाने आरती ओवाळूया ।
संपर्करूपी एकेक पुष्प श्रीरामचरणी वाहूया ।। ५ ।।
मारुतिरायाप्रमाणे दास्यभक्ती करूनी ।
गुरुकृपा संपादन करूया ।। ६ ।।
‘जय श्रीराम, जय हनुमान’ घोषणा करूनी ।
चला, साथी हो करू सिद्धता बलोपासनेची ।। ७ ।।
४. ‘बलोपासनावर्ग सप्ताहा’च्या कालावधीत विविध ठिकाणच्या धर्मप्रेमींना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
४ अ. बलोपासनावर्गामुळे संधीवाताचा त्रास अल्प होणे : ‘मला संधीवाताचा त्रास असल्याने मी सकाळी लवकर उठत नाही; परंतु बलोपासनावर्गामुळे मला लवकर उठण्याची सवय लागली. या वर्गाला उपस्थित रहायला लागल्यापासून झाल्यापासून माझे हात आणि पाय दुखण्याचे प्रमाणही अल्प झाले आहे.’ – सौ. अरुणा पांढरे, ठाणे
४ आ. ‘बलोपासनावर्ग चालू होण्याच्या आधी मला करोना झाला होता. त्यामुळे मला पुष्कळ अशक्तपणा येऊन काहीच करता येत नव्हते. ‘बलोपासनावर्गा’त घेतला जाणारा नामजप केल्याने मला प्राणशक्ती मिळाली.’ – सौ. वैशाली म्हेत्रे, ठाणे
४ इ. ‘स्वरक्षण प्रशिक्षण वर्गाच्या वेळी ‘प्रत्यक्ष मारुतिराया माझ्यासमोर बसले आहेत’, असा भाव ठेवून प्रशिक्षण केल्यामुळे मला उत्साह जाणवत होता.’ – श्री. ओमकार नातू, ठाणे
४ ई. ‘बलोपासनावर्गाच्या वेळी घेण्यात येणाऱ्या शौर्य प्रसंगांच्या माध्यमातून ‘आज्ञापालन आणि भक्ती कशी असावी ?’, हे मला शिकायला मिळाले.’ – कु. मयुरी शिंदे, ठाणे
४ उ. ‘बलोपासनावर्गात प्रतिदिन ‘आज नवीन काय शिकायला मिळेल ?’, अशी मला उत्सुकता वाटत होती. वर्गात सांगितलेल्या शौर्य प्रसंगांतून मला प्रभु श्रीराम आणि हनुमंत यांच्यातील गुणांचे दर्शन घडले. ‘हनुमंतासारखी दास्यभक्ती माझ्यातही यावी’, असे मला वाटले.’ – कु. अक्षता पिंगळे, पुणे
४ ऊ. वर्गाच्या प्रारंभी करण्यात येणारा शंखनाद ऐकल्यानंतर ‘मीही श्रीरामाच्या वानरसेनेतीलच एक आहे’, असे वाटणे : ‘वर्गाच्या प्रारंभी करण्यात येणारा शंखनाद ऐकल्यानंतर ‘मी रणांगणात उभी आहे आणि मीही श्रीरामाच्या वानरसेनेतीलच एक आहे’, असे मला वाटत होते. वर्गाच्या वेळी सांगण्यात येणारे शौर्य प्रसंग ऐकून स्वतःत कोणत्या गुणांची उणीव आहे’, याविषयी माझे चिंतन झाले.’ – कु. कल्पना वटकर, पुणे
४ ए. ‘बलोपासनावर्ग सप्ताहा’त सहभागी झाल्यानंतर प्रशिक्षण सरावामुळे माझ्या शारीरिक स्थितीत सुधारणा झाली.’ कु. मीरा रावत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), वाराणसी
४ ऐ. ‘प्रतिदिन ‘बलोपासनावर्ग समुद्रकिनारी चालू आहे’, असे मला जाणवत असे. या वर्गात ‘दैवी शक्तीच्या माध्यमातून चैतन्य मिळत आहे’, असेही मला जाणवले.’ – कु. राधिका ठोंबरे, बारामती
४ ओ. ‘सकाळी लवकर उठून बलोपासनावर्गाला जोडायला नको’, असे मला वाटत असे; परंतु वर्गाला उपस्थित राहिल्यावर माझ्या लक्षात आले, ‘स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी या वर्गात उपस्थित रहाणे आवश्यक आहे.’ – श्री. गौतम शेडगे, जिल्हा सिंधुदुर्ग
४औ. ‘वर्गाच्या वेळी वेगवेगळे जोडप्रकार शिकतांना ‘भरपूर सराव करण्याची आवश्यकता आहे’, याची मला जाणीव झाली. वर्गात ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’, असा जयघोष करत जोर आणि बैठका काढल्यामुळे त्या सहजतेने काढता आल्या.’ – श्री. भरत भानजी, जिल्हा सिंधुदुर्ग
४ अं. ‘बलोपासनावर्गा’मुळे आपत्कालीन परिस्थितीत तरून जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढली, तसेच मला हिंदु धर्माविषयी अभिमान अन् आदर वाटू लागला.’ – श्री. सुयोग सुभाष राऊळ, जिल्हा सिंधुदुर्ग
४ क. ‘बलोपासनावर्गामुळे माझ्यात ‘कोणताही प्रसंग ओढवला, तरीही घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाऊ शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण झाला.’ – कु. सायली लळित, जिल्हा सिंधुदुर्ग
५ ‘ऑनलाईन बलोपासनावर्ग’ घेतांना प्रशिक्षणसेवकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
५ अ. बलोपासनावर्गामुळे शारीरिक क्षमता वाढणे : ‘या वर्गाच्या माध्यमातून माझी शारीरिक क्षमता पुष्कळ वाढली. पूर्वी मला ‘२० ते ३०’ अंक मोजेपर्यंत व्यायाम केल्यावर लगेच थकवा येत असे आणि पुढील प्रकार करणे अशक्य होत असे; परंतु बलोपासनावर्गामध्ये ‘१०० ते १५० अंक मोजेपर्यंत व्यायाम केला’, तरी मला थकवा येत नव्हता.’ – श्री. ज्ञानदीप चोरमले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सोलापूर
५ आ. बलोपासनावर्गात घेतलेल्या नामजपाचा परिणाम
१. लाभ : ‘बलोपासना सप्ताहाच्या कालावधीत सकाळी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केल्यामुळे दिवसभर मनाची स्थिती सकारात्मक रहात असे.
२. अनुभूती : बलोपासनावर्गात ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करतांना ‘तो नामजप माझ्याभोवती गोल, गोल फिरत आहे’, असे मला जाणवत असे.’ – श्री. अभिजित कुलकर्णी, पुणे
५ इ. बलोपासनावर्गाच्या प्रारंभी मनात नकारात्मक विचार येणे, त्यानंतर ‘वानरांनी प्रभु श्रीरामाचे नाम निर्जीव दगडांवर लिहून ते दगड समुद्रात टाकल्यावर दगड तरंगले’, हा विचार मनात येणे आणि शरिराच्या दुखणाऱ्या अवयवांवर सूक्ष्मातून श्रीरामाचे नाम लिहिल्यावर शारीरिक त्रास नाहीसा होऊन उत्साही वाटणे : ‘सप्ताहाच्या प्रारंभीचे ३ दिवस अंगदुखी आणि स्नायूदुखी यांमुळे माझ्या मनात ‘दुसऱ्या दिवशी प्रशिक्षण घ्यायला नको’, असा नकारात्मक विचार येत होता; परंतु त्याच वेळी भगवंताने माझ्या मनात विचार दिला, ‘अजून १ दिवस प्रशिक्षण करून बघूया.’ चौथ्या दिवशी प्रशिक्षण घ्यायला प्रारंभ करण्यापूर्वी माझे अंग पुष्कळ दुखत होते. त्यानंतर वर्गाच्या प्रारंभी १० मिनिटे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपाला प्रारंभ झाल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘वानरांनी प्रभु श्रीरामाचे नाव निर्जीव दगडावर लिहून ते दगड समुद्रात टाकल्यावर दगड तरंगू लागले.’ मी माझ्या शरिराच्या दुखणाऱ्या अवयवांवर ‘श्रीराम’ नाम लिहिण्यास प्रारंभ केला. त्यामुळे मला ‘वर्ग कधी संपला’, कळलेच नाही. त्यानंतर मला शारीरिक त्रास झाला नाही. या बलोपासना वर्ग सप्ताहामुळे माझ्या उत्साहात वाढ झाली.’ – श्री. नीलेश शेटे, कोल्हापूर
५ ई. ‘बलोपासनावर्गाला जोडलेल्या अनेक धर्मप्रेमींनी मला भ्रमणभाषद्वारे संपर्क करून सांगितले, ‘‘या बलोपासनावर्गामुळे त्यांचे शारीरिक त्रास अल्प झाले आहेत.’ – कु. प्राची शिंत्रे, पुणे
५ उ. बलोपासनावर्गात हनुमंताचे अस्तित्व जाणवणे : ‘बलोपासनावर्ग चालू झाल्यानंतर आरंभीचे दोन दिवस काही वानर समोरच्या बाजूला असलेल्या झाडावर येऊन बसत होती. त्या वेळी मला वाटले, ‘हनुमंतच वानरसेनेसह येऊन बलोपासनावर्ग पहात आहे.’ बलोपासनावर्गात श्रीरामाविषयीचे प्रसंग सांगत असतांना मला वाटले, ‘ज्या ठिकाणी श्रीरामाची स्तुती होते, त्या ठिकाणी हनुमंत प्रत्यक्ष उपस्थित असतो.’ हे देवाने मला प्रत्यक्षात अनुभवायला दिले. मला त्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ – श्री. श्रेयस पिसोळकर, गोवा
६. सर्व धर्मप्रेमींच्या प्रतिसादामुळे १ वर्ष होऊनही बलोपासना वर्ग नियमितपणे चालू असणे : हनुमान जयंतीच्या दिवशी ‘बलोपासना वर्ग सप्ताह’ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘भक्ती-शक्ती संमेलन’ म्हणून एक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला ६३० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या वेळी बलोपासनावर्गाला जोडलेल्या युवकांनी ‘बलोपासनावर्ग नियमित चालू ठेवावा’, अशी मागणी केली. त्या दृष्टीने ‘आणखी १५ दिवस हा वर्ग चालू ठेवूया’, असा निर्णय झाला. त्यानंतरही हा वर्ग चालू ठेवण्याची मागणी झाल्यामुळे १ वर्ष होऊनही हा बलोपासनावर्ग चालू आहे. या वर्गाला सध्या अनुमाने २०० हून अधिक जण नियमितपणे जोडलेले असतात.’
७. कृतज्ञता : ‘हा बलोपासनावर्ग म्हणजे आम्हा सर्व स्वरक्षण प्रशिक्षणसेवकांवर प.पू. गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेचा भरभरून झालेला वर्षाव आहे. या बलोपासना वर्गाच्या माध्यमातून ‘गुरुतत्त्व कसे कार्य करते ? प.पू. गुरुदेव काळानुसार साधना कशी करवून घेतात ? गुरुकृपेचा वर्षाव काय असतो ?’, हे सर्व प.पू. गुरुदेवांच्या अनंत कृपेमुळे आम्ही सर्वांनी अनुभवले. याबद्दल आम्ही श्रीरामस्वरूप प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनन्यभावे शरण जाऊन कृतज्ञता व्यक्त करतो.
८. प्रार्थना : हे गुरुराया, आम्हा जिवांची दास्यभावाने आपल्या चरणी प्रार्थना आहे.
कधी न चळावे चंचल हे मन ।
श्रीरामा या चरणांपासून ।। १ ।।
जोवरी जगी श्रीराम असावा ।
तोवरी जन्म असावा ।। २ ।।
हा एकच वर द्यावा ।
गुरुराया, आम्हा एकच वर द्यावा ।। ३ ।।
या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |