मुंबई – आय.एन्.एस्. विक्रांत जहाजाच्या निधी अपहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने त्वरित अटकेपासून दिलासा दिला आहे. आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून सोमय्या यांनी सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. या निर्णयाच्या विरुद्ध सोमय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने सोमय्या यांच्या विरुद्ध करण्यात आलेली तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्याच वेळी सोमय्या यांनी चौकशीसाठी पोलिसांसमोर उपस्थित रहावे, तसेच अटक झाल्यास ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.