श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण किंवा प्रभु श्रीरामरायाचे नामस्मरण केल्यामुळे व्यक्तीभोवती संरक्षककवच निर्माण होऊन सूक्ष्म जीवजंतू, तसेच वाईट शक्ती यांपासून तिचे रक्षण होत असणे

१. पूर्वी हिंदु कुटुंबात प्रतिदिन सायंकाळी नित्य स्तोत्रांचे पठण केले जाणे आणि त्यामध्ये श्रीरामरक्षास्तोत्राचा पाठ करणे अनिवार्य असणे

 

श्रीमती कमलिनी कुंडले

अनुमाने ४० ते ५० वर्षांपूर्वी प्रत्येक हिंदु कुटुंबात प्रतिदिन संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी घरातील आजी-आजोबा किंवा वडीलधारी व्यक्ती लहान मुलांना समवेत घेऊन ‘शुभं करोति कल्याणं…।’ ही दिव्याला उद्देशून करावयाची प्रार्थना आणि काही नित्य स्तोत्रांचे पाठ करत असत. त्यामध्ये श्रीरामरक्षास्तोत्राचा पाठ करणे अगदी अनिवार्य होते. पठणानंतर देवघरातील उदबत्तीची विभूती अगदी अगत्याने प्रत्येकाच्या कपाळावर लावली जात असे. त्यामुळे ‘सर्व प्रकारच्या जीवजंतूंपासून रक्षण होते’, ही श्रद्धा होती.

२. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण किंवा प्रभु श्रीरामरायाचे नामस्मरण यांमुळे व्यक्तीभोवती संरक्षककवच निर्माण होणे

श्रीरामरक्षास्तोत्रातील पुढील श्लोक महत्त्वपूर्ण आहे.

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।। – श्रीरामरक्षास्तोत्र, श्लोक ११

अर्थ : रामनामाने ज्याचे रक्षण केले जाते, त्याला पाताळ, पृथ्वी आणि आकाश या ठिकाणी हिंडणारे कपटी (मायावी) लोक पाहूसुद्धा शकणार नाहीत.

२ अ. रामनामामुळे व्यक्तीला जीवजंतूंची बाधा न होणे : ‘छद्म’ म्हणजे गुप्त किंवा कपट आणि ‘चारिण’ म्हणजे वावरणारे किंवा फिरणारे ! डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जीवजंतू आणि इतर वाईट शक्ती, उदाहरणार्थ असुर, राक्षस, पिशाच या योनीतील जीव आपल्या भोवती वावरत असतात. असे जे ‘छद्मचारिण’ असतात, ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत; परंतु त्यांच्यामुळे होणारे परिणाम किंवा लक्षणे यांमुळे आपल्याला त्यांचे अस्तित्व कळते. जसे कोरोनासारखे किंवा अन्य विषाणू आणि जीवजंतू हे पाताळात, पृथ्वीवर, तसेच वातावरणात नेहमीच असतात. त्यांचे प्रमाण अकस्मात् वाढले, तर ते रोग निर्माण करतात. रामनाम घेणाऱ्यांना मात्र ते काही करू शकत नाहीत.

तात्पर्य काय, तर श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण किंवा प्रभु श्रीरामरायाचे नामस्मरण, यांमुळे व्यक्तीभोवती जे संरक्षककवच निर्माण होते, त्यामुळे वातावरणातील कुठल्याही प्रकारचे जीवजंतू त्या व्यक्तीला काही करू शकत नाहीत, तर मग त्यांची बाधा होणे दूरच ! यासाठी एक पथ्य मात्र अवश्य पाळावे लागते, ते म्हणजे स्तोत्र किंवा नामस्मरण पूर्ण श्रद्धेने करायला हवे.

३. महाभयंकर आपत्काळाला तोंड देण्यासाठी देवभक्ती, उपासना आणि साधना यांकडे वळणे आवश्यक !

आता ‘कोरोना’ विषाणूसारख्या सतत स्वत:चे स्वरूप पालटणाऱ्या आणि अधिकाधिक घातक असलेल्या विषाणूपासून रक्षण होण्यासाठी तरी पुनश्च आपल्याला आपल्या मूळ संस्कारांकडे वळावेच लागेल ! येणारा काळ आणखी भयंकर असणार आहे. या काळात किमान जिवंत रहाण्यासाठी तरी आपल्याला देवभक्ती, उपासना आणि साधना यांकडे वळावेच लागेल !

‘हे श्रीकृष्णा, तुझ्या चरणांकडे येण्याची सद्बुद्धी आणि ओढ तूच आम्हा सर्वांमध्ये निर्माण कर. तूच तुला अपेक्षित अशी साधना आमच्याकडून करवून घे’, अशी तुझ्या सुकोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.

– श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.८.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक