शरद पवार यांच्या घरावर आक्रमण केल्याचे प्रकरण
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी एस्.टी. कर्मचार्यांचे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच इतर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एस्.टी. कर्मचार्यांनी ८ एप्रिल या दिवशी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. या प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.
सरकारी अधिवक्त्यांनी सुनावणीच्या वेळी म्हटले की, सदावर्ते यांनी कामगारांना भडकावले आहे. त्यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केले आहे. पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले. आक्रमण करणारे खरोखर एस्.टी. कामगार होते कि भाडोत्री होते, याची पडताळणी करायची असल्याने १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. सदावर्ते यांच्या वतीने बाजू मांडतांना अधिवक्ता महेश वासवानी म्हणाले, ‘‘९२ सहस्र कर्मचार्यांचा लढा यशस्वी झाल्याने त्याचा राग म्हणून सरकार असे करत आहे. सदावर्ते यांनी नेहमीच आंदोलकांना ‘शांतता पाळा’, असे सांगितले होते.