वीज आस्थापनांचे खासगीकरण नाही ! – डॉ. नितीन राऊत, ऊर्जामंत्री

सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज आस्थापनांचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. शिर्डी येथे विद्युत् क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे २० वे द्विवार्षिक महाअधिवेशन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. राऊत पुढे म्हणाले की, वीज कामगार अथक प्रयत्न करून वीज गळती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात, तसेच पूर काळात वीज कामगारांनी जिवाची पर्वा न करत अखंडित वीजपुरवठा करण्याचे कार्य केले. वीज आस्थापनांचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार अनेक खटपटी करत आहे; मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही. याउलट वीज आस्थापनातील कामकाजात सुधारणा करून त्याची पुनर्बांधणी करण्याचे कार्य जोमाने चालू आहे. भविष्यात कर्मचार्‍यांची सुधारित वेतनश्रेणी, वेतनकरार, अनुकंपा नोकरी, इंधनभत्ता आदींविषयी सकारात्मक निर्णय घेतले जातील.