नाशिक येथे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात व्यवस्थापकाची प्रतिदिन मेजवानी !

  • ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रकरण उघडकीस !

  • भांडार कार्यालयाचे व्यवस्थापक मद्य पितांना आढळले !

शैक्षणिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करणाऱ्या विद्येच्या घरात असे लज्जास्पद कृत्य करणारे व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांच्यावर बडतर्फीची कारवाई त्वरित व्हायला हवी. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू असतांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष का दिले नाही ? असे व्यवस्थापक शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासत आहेत ! – संपादक

पलंगावर बसून मद्य पितांना व्यवस्थापक लक्ष्मण डामसे

नाशिक – येथील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयाचे व्यवस्थापक लक्ष्मण डामसे हे मद्य पितांना आढळून आले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने ‘स्टिंग ऑपरेशन’ करून या प्रकरणाचा भांडाफोड केला. (‘स्टिंग ऑपरेशन’ करून हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन ! जी गोष्ट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिसते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणाऱ्या पाठ्यपुस्तक भांडाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना का दिसत नाही ? – संपादक) 

शहरातील लेखानगर या भागात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराचे कार्यालय आहे. येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची निर्मिती होते. कार्यालयातील अनेक खोल्यांमध्ये पुस्तकाचे गठ्ठे आहेत. गेल्या काही दिवसांपासून भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे हे या कार्यालयात प्रतिदिन मद्य पितात, अशी माहिती मिळाली होती. त्यांचे कृत्य चव्हाट्यावर आणण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने व्हिडिओ सिद्ध केला. ‘जर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या विद्येच्या पवित्र कार्यालयात त्या विभागाचे प्रमुखच असे काम करत असतील, तर कर्मचाऱ्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार चालू होता. (असे आहे, तर याकडे कुणाचेच लक्ष कसे गेले नाही ? – संपादक)