मंदिरांच्या माध्यमातूनच हिंदूंचे संघटन होते आणि त्यांना धर्मकार्य करण्याची शक्ती मिळते ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देवस्थान भूमी परत मिळवण्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याच्या हेतूने आयोजित कार्यक्रम !

काळभैरव मंदिरात जमलेले  श्री. किरण दुसे, मंदिराचे विश्वस्त, तसेच अन्य

गोंदवाड (जिल्हा बेळगाव), ६ एप्रिल (वार्ता.) – मोगलांच्या काळात मंदिरांवर आक्रमणे झाली, इतकेच काय स्वातंत्र्यानंतरही अगदी अलीकडच्या काळात मंदिरांवर आक्रमणे झाली आहेत. आंधप्रदेश येथे मूर्तीभंजनाच्या घटना घडल्या आहेत, तर गोव्यातही मूर्ती चोरीची प्रकरणे घडली आहेत. हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचे स्रोत आहेत. मंदिरांच्या माध्यमातूनच हिंदूंचे संघटन होते आणि त्यांना धर्मकार्य करण्याची शक्ती मिळते. त्यासाठी मंदिरे सुरक्षित रहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. काळभैरव देवस्थान येथे भाविकांनी देवस्थान भूमी परत मिळवण्यासाठी चालू असलेल्या लढ्याची माहिती देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून श्री. किरण दुसे बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करतांना श्री. किरण दुसे

श्री. विनायक पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. काळभैरव मंदिराचे भक्त आणि ग्रामस्थ श्री. सतीश राजेंद्र पाटील यांनी गेले २ वर्षे या देवस्थानची भूमी परत मिळवण्यासाठी कशाप्रकारे लढा उभारण्यात आला आणि न्यायालयीन लढाई कशी चालू आहे, याची माहिती दिली. कंग्राळी बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ श्री. यल्लोजीराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. बापू सावंत, देवस्थान पंच समितीचे सदस्य सर्वश्री नंदू निलजकर, बाळू पाटील, लक्ष्मण पाटील, जोतिबा पाटील, मधू पवार, महेश पिंगट, हरि चौगुले उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी १ सहस्र ग्रामस्थांची उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ
कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ

श्री. किरण दुसे पुढे म्हणाले, ‘‘या संदर्भात चालू असलेल्या लढ्याविषयी गावातील युवकांचे मी अभिनंदन करतो. या लढ्याला पुढे निश्चित यश मिळेल. जर देवस्थानची भूमी कुणी हडप करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला देव कधीच क्षमा करणार नाही. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावर शौचालय उभे करण्यात आले होते. त्या संदर्भात समितीने लढा उभारून आंदोलन उभे केले. आता प्रशासनाने हे कुंड भाविकांसाठी खुले केले आहे. हे समितीचे यश असून अशाच प्रकारे देशभरातील मंदिरांसाठी हिंदु जनजागृती समिती विविध माध्यमांतून लढा देत आहे.’’

क्षणचित्रे

१. मार्गदर्शन संपल्यावर श्री. सतीश पाटील यांनी मंदिरासाठी दिलेल्या लढ्याविषयी एक ‘व्हिडिओ क्लिप’ दाखवली.

२. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आमदार सतीश जारकीहोळी यांचे सचिव श्री. मलगोंडा पाटील उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त केले.

काय आहे नेमके प्रकरण ?

वर्ष १९५० मध्ये तत्कालीन सांगली संस्थानने काळभैरव देवस्थानची २७ एकर भूमी गावातील ६ जणांना ‘इनाम’ म्हणून कसण्यासाठी दिली होती. यातील उत्पन्नाद्वारे मंदिराचे धार्मिक कार्यक्रम होत असत. कालांतराने ६ कुटुंबियांनी ही भूमी हडप करून त्यांच्या स्वत:च्या नावावर करून घेतली. एकदा देवस्थानने अन्य ठिकाणी जाण्यासाठी रस्ता करण्यासाठी भूमी मागितल्यावर यातील काही कुटुंबियांनी ती देण्यास नकार दिला. त्या वेळी भक्तांनी अधिक माहिती घेतली असता एकूणच परिस्थिती समोर आली आणि भूमी हडप केल्याचा सर्व प्रकार समोर आला. हा लढा चालू असतांना मंदिराची भूमी परत मिळवतांना भाविकांना काही वेळा प्राणघातक आक्रमणांनाही सामोरे जावे लागले; मात्र श्री काळभैरवाच्या श्रद्धेपोटी त्यांनी हा लढा चालू ठेवला. अखेर गावकऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३ एप्रिल या दिवशी ६ पैकी २ कुटुंबियांनी संपूर्ण गावासमोर ही भूमी देवस्थानला परत देत असल्याचे घोषित केले.