शेतकऱ्यांच्या हानीभरपाईची रक्कम न दिल्याने राज्यशासनाने विमा आस्थापनांचा हप्ता रोखला ! – दादाजी भुसे, कृषीमंत्री

मुंबई, ६ एप्रिल (वार्ता.) – वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या पिकांच्या हानीची भरपाई विमा आस्थापनांनी न दिल्यामुळे राज्यशासनाने विमा आस्थापनांचा २ सहस्र ३०० कोटी रुपयांचा हप्ता रोखला आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. ६ एप्रिल या दिवशी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलतांना ही माहिती भुसे यांनी दिली.

कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांकडून पिकांच्या हानीविषयीची माहिती वेळेत न मिळाल्यामुळे विमा आस्थापनांनी शेतकऱ्यांना पिकांच्या हानीभरपाईचे ८०० कोटी रुपये दिलेले नाहीत. जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकांच्या हानीभरपाईची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत विमा आस्थापनांना विम्याचा दुसरा हप्ता दिला जाणार नाही, असे या वेळी दादाजी भुसे यांनी म्हटले.

खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी देहली येथे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. या भेटीची माहिती देण्यासाठी भुसे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. वर्ष २०२२ साठी खरीप काळातील पिकांसाठी राज्यशासनाने ५२ लाख मेट्रिक टन खतांची मागणी केली असून त्यांतून ४५ मेट्रिक टन खते उपलब्ध करून देण्याला मान्यता मिळाली आहे, असे भुसे यांनी सांगितले.

कर्नाटकमधील आंब्याची ‘कोकणचा आंबा’ म्हणून विक्री !

कोकणातील वृत्तपत्रे आंब्याच्या पेटीत घालून कर्नाटकातील आंबा ‘कोकणचा आंबा’ म्हणून विकण्यात येत आहे. सहकार आयुक्तांकडून याविषयी कारवाईचा आदेश देण्यात आला असून नवी मुंबईतील वाशी येथे कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी २ गुन्हेही नोंदवण्यात आले असल्याचे दादाजी भुसे यांनी म्हटले.

वन्य प्राण्यांमुळे शेतीची हानी ही संपूर्ण महाराष्ट्राची समस्या !

वन्य प्राण्यांमुळे होणारी शेतीची हानी ही केवळ कोकणची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची समस्या आहे. त्यावर काटेरी कुंपण करणे किंवा वन्य प्राण्यांना त्यांच्या क्षेत्रात सोडणे हाच उपाय आहे, असे दादाजी भुसे यांनी म्हटले.