‘लॉटरी तिकीट विक्री स्टॉल’ आता मंत्रालयातही !

महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीचा स्टॉल चक्क मंत्रालयातच !

मुंबई, ६ एप्रिल (वार्ता.) – ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ या राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त लॉटरीच्या विक्रीचे स्टॉल आतापर्यंत रेल्वेस्थानके, बसस्थानके आदी सार्वजनिक ठिकाणी पहायला मिळत होते. आता मात्र महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीचा स्टॉल चक्क मंत्रालयातच लावण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत’ या नावाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने या लॉटरीची सोडत काढली आहे.

राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून महाराष्ट्र राज्य लॉटरीचा व्यवहार पाहिला जातो. महाराष्ट्र राज्य लॉटरीसाठी वित्त विभागात स्वतंत्र विभाग आहे. ‘महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडती’च्या नावाने राज्य सरकारने एकूण दीड लाख लॉटरीची तिकिटे छापली आहेत. २८ मार्चपासून या तिकिटांची विक्री चालू असून ११ एप्रिलपर्यंत तिकिटांची विक्री होणार आहे. या तिकिटाचे मूल्य २०० रुपये असून आतापर्यंत ५०० हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. यातील पहिले बक्षीस ५१ लाख रुपयांचे बक्षीस सामायिक पद्धतीने आहे, दुसरे बक्षीस १० लाख रुपयांच्या बक्षिसातून २ विजेत्यांची निवड होणार आहे, तर प्रोत्साहनपर ८ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये अनेक छोटी बक्षिसे आहेत. १२ एप्रिल या दिवशी या लॉटरीची सोडत होणार आहे. लॉटरीला अधिकृत करून यापूर्वी सरकारने लॉटरीला राज्यमान्यता दिली आहे. आता मंत्रालयात तिकीट विक्रीचा स्टॉल उभारून सरकारने लॉटरीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.