सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा नोंद !

  • सामाजिक कार्याच्या नावाखाली राष्ट्राच्या उत्कर्षात बाधा आणणाऱ्यांवर कारवाई हवी !
  • मेधा पाटकर यांनी अनेक विकास प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यामुळे त्यांना कोण देणग्या देते, त्यांचे कामकाज कसे चालते, याविषयीची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वयंसेवी संस्थेची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे, अशीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

मुंबई –  सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ या स्वयंसेवी संस्थेच्या (एन्.जी.ओ.च्या) खात्यावर काही संशयित व्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) गुन्हा नोंद केला आहे.

१. मेधा पाटकर यांच्या विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडीकडे) एका संशयास्पद व्यवहाराची तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण वर्ष २००५ चे असून ईडी याची चौकशी करणार आहे. महसूल गुप्तचर संचालनालय आणि आयकर या विभागांनीही पाटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

२. ‘नर्मदा नवनिर्माण अभियान’ हे बृहनमुंबई चॅरिटी कमिशनर यांच्याकडे नोंदणीकृत आहे. यामध्ये मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. या संस्थेच्या खात्यावर एकाच दिवशी १ कोटी १९ लाख २५ सहस्र ८० रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे आढळून आले आहे.

३. ही सर्व रक्कम २० वेगवेगळ्या खात्यांवरून ५ लाख ९६ सहस्र २९४ रुपयांच्या एक समान रक्कमेच्या व्यवहारांच्या स्वरूपात जमा झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही रक्कम जमा करणाऱ्या देणगीदारांपैकी एक देणगीदार पल्लवी प्रभाकर भालेकर या त्या वेळी अल्पवयीन होत्या.

४. पाटकर यांच्या या संस्थेला संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘माझगाव डॉक लिमिटेड’कडून ६ टप्प्यांमध्ये ६२ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्या कशा आणि कुणी दिल्या, याची चौकशी करण्यात येणार आहे