१. राजाने राजकारणाविषयी घ्यावयाची काळजी
१ अ. शत्रू जसा असेल, तसे वागणे आवश्यक ! : ‘शत्रू सज्जन असेल, तर त्याच्याशी सज्जनपणे वागावे. तो मायावी, कपटी आणि घातकी असेल, तर त्याच्याशी तसेच वागावे. हा मनुचा विचार आम्ही विसरलो; म्हणून आमच्यामध्ये सामर्थ्य असून आपल्याला पराभव पत्करावा लागला.
भिन्द्याच्चैव तडागानि प्राकारपरिखास्तथा ।
समवस्कन्दयेच्चैनं रात्रौ वित्रासयेत्तथा ।।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक १९६
अर्थ : शत्रूची तळी, तट आणि खंदक यांचा फोडून नाश करावा. शत्रूला घाबरवावे. रात्रीही त्याला स्वस्थता मिळू देऊ नये.
१ आ. पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्यामुळे त्याच्याकडून भारतावर वारंवार आक्रमणे होणे : दुसऱ्या महायुद्धात हिटलरने रशियावर जेव्हा आक्रमण केले, तेव्हा रशियाने स्वसंरक्षणासाठी हे दग्धभू धोरण अवलंबले होते. अल्पसंख्यांकांनी हेच धोरण अवलंबले; पण आम्ही मात्र आमच्या शत्रूचा निःपात करण्यासाठी या धोरणाचा अवलंब केला नाही. त्यामुळे आम्ही पराभूत झालो. त्यांनी आमची तळी नुसती फोडली नाहीत, तर त्यात विष टाकले. आपण जशास तसे वागलो नाही, तर शत्रूचा नाश कसा होणार ? आम्ही मनुस्मृति विसरलो; म्हणून आम्ही षंढ झालो आणि शत्रूकडून मार खात आहोत.
आपल्याला ३ वेळा अशी संधी मिळाली होती, तरी आपण पाकिस्तानचा नाश केला नाही आणि मूर्खासारखे वागून जिंकलेला प्रदेश परत दिला अन् युद्ध थांबवले.
१ इ. निर्भयपणे युद्ध करणे आवश्यक : जय मिळवण्याच्या इच्छेने योग्य संधी मिळताच आणि दैव अनुकूल आहे, हे जाणून निर्भयपणे युद्ध करावे.
१ ई. राजाने दैवावर अवलंबून रहाणे अयोग्य असणे : शत्रूवर विजय मिळवला, म्हणजे त्याच्या प्रदेशातील लुटालूट करून धन ओरबाडावे, हे योग्य नाही. असे केल्यास ती प्रजा संतापून बंड करते. राजाने दैवावर अवलंबून राहू नये.
१ उ. राजाने आपल्यापेक्षा अल्प बळ असलेला मित्र मिळवला, तर ते राज्यासाठी हितकर असणे : राजाने धार्मिक, कृतज्ञ, समाधानी, प्रेम करणारा, कार्य मध्येच न सोडणारा; पण आपल्यापेक्षा अल्प बळ असलेला मित्र मिळवावा. अधिक बलवान मित्र केला, तर तोच आक्रमण करण्याची शक्यता असते. बलाढ्य चीनशी मैत्री केली, तर त्याचे फळ काय मिळाले ? त्याने आपल्यावर आक्रमण करून सहस्रो चौरस मैलाचा प्रदेश गिळला. त्या वेळी दुबळ्या तिबेटशी मैत्री केली असती, तर चीनशी आपल्या सीमा भिडल्या नसत्या.
१ ऊ. आपदर्थे धनं रक्षेद्दारान् रक्षेद्धनैरपि ।
आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरपि ।।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २१३
अर्थ : राजाने आपत्तीसाठी धन राखावे. बायका-मुलांच्या रक्षणासाठी धनाचाही त्याग करावा; परंतु स्वतःच्याच रक्षणाचा प्रसंग आला असता राजाने धन आणि कुटुंब यांचा त्याग करून स्वतःचे सतत रक्षण करावे.
१ ए. राजाने कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे रक्षण करणे अत्यावश्यक असणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व किल्ले मिर्झाराजे जयसिंग यांना देऊन स्वतःचे आणि राज्याचे रक्षण केले. महाराणा प्रताप यांनी राज्य सोडून देऊन वनवास पत्करला. राजा जिवंत राहिला, तर तो पुन्हा राज्य परत मिळवेल; म्हणून त्याने सर्व प्रकारचे प्रयत्न करून स्वतःचे रक्षण करावे.
सगळीकडून संकटे कोसळली, तर त्यातून सुटण्यासाठी राजाने सामदामादी सर्व उपाय योजावेत. छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंगाशी अशाच प्रकारे वागले; म्हणून स्वराज्य वाचले. राजा हा सतत दक्ष असला पाहिजे. अशी दक्षता न घेतल्याने आपण दोन पंतप्रधान गमावले.
१ ऐ. राज्याची सुरक्षा शासनकर्त्यावर अवलंबून असल्यामुळे त्याची सुरक्षा महत्त्वाची : शासनकर्त्याची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असते. त्याच्यावर राज्याची सुरक्षा अवलंबूनअसते; म्हणून राजाने सावध असावे. समर्थ रामदासस्वामी तेच सांगतात, ‘अखंडचि सावधाना ।’ (दासबोध, दशक १८, समास ६, ओवी १०) म्हणजे ‘सतत सावधच असायला हवे.’
‘श्रीमती इंदिरा गांधी यांना शीख आतंकवाद्यांकडून आणि राजीव गांधी यांना तमिळी आतंकवाद्यांकडून धोका आहे’, हे गुप्तचरांनी सांगितले होते; पण त्यांनी ते मनावर घेतले नाही. परिणाम काय झाला ? त्या दोघांना प्राण गमवावा लागला.
२. राजाने वैयक्तिक जीवनाविषयी घ्यावयाची काळजी
२ अ. राजाने नियमितपणे व्यायाम करावा !
एवं सर्वमिदं राजा सह सम्मन्त्र्य मन्त्रिभिः ।
व्यायम्याप्लुत्य मध्यान्हे भोक्तुमन्तःपुरं विशेत् ।।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २१६
अर्थ : अशा प्रकारे राजाने पूर्वाेक्त सर्व गोष्टींवर मंत्रीगणांसह राजकीय चर्चा करावी, नियमित शरीरस्वास्थ्यासाठी व्यायाम करावा आणि मध्यान्हकाली करण्याच्या सर्व क्रिया आटोपून भोजनासाठी अंतःपुरात प्रवेश करावा.
विजयनगरचा राजाचा व्यायाम कसा होता, हे परकीय प्रवाशांनी लिहून ठेवले आहे, ‘राजा पहाटे ३ वाजता उठत असे. दोन शेर तेल अंगावर दासाकडून चोपडून घेत असे. नंतर तो घोड्यावरून रपेट करी. अंगावरील तेल घामाने जिरेपर्यंत व्यायाम करत असे.’
२ आ. अन्नग्रहण करतांना आणि अन्य वेळीही राजाने घ्यावयाची दक्षता !
२ आ १. तत्रात्मभूतैः कालज्ञैरहार्यैः परिचारकैः ।
सुपरीक्षितमन्नाद्यमद्यान् मन्त्रैर्विषापहैः ।।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २१७
अर्थ : तेथे (अंतःपुरामध्ये) राजाने जे अन्न भक्षण करायचे आहे, ते काळ, वेळ जाणणाऱ्यांनी (जाणकारांनी) शिजवलेले असावे. ते विश्वासू नोकरांनी प्रेमाने रांधलेले, विषयुक्त आहे कि नाही, हे तज्ञ लोकांनी पारखलेले आणि विषदोषनाशक मंत्रांनी प्रोक्षण केलेले असावे.
२ आ २. विषघ्नैरगदैश्चास्य सर्वद्रव्याणि योजयेत् ।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २१८
अर्थ : खाण्याच्या सर्व वस्तूंमध्ये नेहमी न विसरता विषनाषक औषधे मिसळावी, म्हणजेच अन्नाची पारख करण्यासाठी ते अग्नीवर टाकणे, विषनाशक रत्ने धारण करणे, पशूपक्षांना ते खायला देणे आणि अन्न शिजवणाऱ्याला ते खायला घालणे इत्यादी उपाय योजणे आवश्यक आहे.
२ आ ३. विषघ्नानि च रत्नानि नियतो धारयेत् सदा ।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २१८
अर्थ : तसेच विषाचा नाश करणारी रत्ने अंगावर नित्य धारण करावी.
२ आ ४. परीक्षिताः स्त्रियश्चैनं व्यजनोदकधूपनैः ।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २१९
अर्थ : राजाला वारा घालणे, स्नानादींसाठी पाणी देणे, धूपन करणे अशा कामांसाठी योजण्यात येणाऱ्या स्त्रियांचे योग्य परीक्षण करावे.
दास, दासी आणि नोकर यांच्यापासूनही धोका होऊ शकतो; म्हणून सर्व नोकर परीक्षा केलेले असावेत. त्यांचे वेश आणि दागिने धोका नसलेले आहेत, हे पहावे. अशांनाच अंतःपुरात कामे द्यावीत.
२ आ ५. वेषाभरणसंशुद्धाः स्पृशेयुः सुसमाहिताः ।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २१९
अर्थ : ज्यांचे वेश आणि आभूषणे शुद्ध आहेत अशा गुप्तचरांद्वारे परीक्षण केल्या गेलेल्या स्त्रियांचीच अंतःपुरात नेमणूक करावी.
केवळ अन्नातूनच नव्हे, तर राजाला वस्त्रे, अंथरूणे, पांघरूणे आणि पात्रे यांतूनही विषबाधा होऊ शकते. त्याचीही दक्षता घ्यावी.
२ आ ६. एवं प्रयत्नं कुर्वीत यानशय्याऽऽसनाशने ।
स्नाने प्रसाधने चैव सर्वालङ्कारकेषु च ।।
– मनुस्मृति, अध्याय ७, श्लोक २२०
अर्थ : अशा प्रकारे वाहने, शय्या, आसने, आहार, स्नान, प्रसाधने, वस्त्र आणि अलंकार इत्यादी सर्व ठिकाणी प्रयत्नपूर्वक निर्दाेषता राखावी.
– (कै.) भागवताचार्य वा.ना. उत्पात, सोलापूर
(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, जुलै २०१३)