निरपेक्षपणे संगीत साधना करणारे ठाणे येश्रील शास्त्रीय गायक श्री. संजय मराठे यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

 

श्री. संजय मराठे

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा –  सहजता, निर्मळता आदी गुण असलेले, वडिलांना गुरुस्थानी मानणारे आदर्श शिष्य आणि त्यांचे आज्ञापालन करून फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे संगीत साधना करणारे ठाणे येथील श्री. संजय मराठे ((स्वर्गीय) पंडित राम मराठे यांचे सुपुत्र) हे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंदवार्ता महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी दिली. ४ एप्रिल २०२२ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. या प्रसंगी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी श्री. संजय मराठे यांना भगवान शिवाचे सनातन-निर्मित चित्र देऊन त्यांचा सत्कार केला. या सोहळ्याला श्री. संजय मराठे यांच्या पत्नी सौ. गायत्री मराठे यांच्यासह महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून संगीताचा अभ्यास करणारे साधक उपस्थित होते. या भावस्पर्शी सोहळ्यात उपस्थितांच्या डोळ्यांत आपसूकच भावाश्रू तरळले.

श्री. संजय मराठे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून चालणारे संगीत क्षेत्रातील कार्य जाणून घेण्याच्या दृष्टीने श्री. संजय मराठे आणि त्यांची पत्नी सौ. गायत्री मराठे १ एप्रिल २०२२ या दिवशी सनातनच्या आश्रमात आले आहेत. आश्रमातील वास्तव्याच्या काळात त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कार्यातही सहभाग घेतला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित संशोधनात्मक प्रयोगात श्री. संजय मराठे यांनी गायनसेवा प्रस्तुत केली. प्रथम दिवशी त्यांनी राग ‘सामंत सारंग’, राग ‘चंद्रकौंस’ आणि दुसऱ्या दिवशी राग ‘रामकली’ प्रस्तुत केला. त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांचा गायनाच्या माध्यमातून असणारा संगीत साधनाप्रवास जाणून घेण्यासाठी श्री. संजय मराठे यांची मुलाखतही घेण्यात आली. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्याशी संगीत साधनेतील अनुभवांविषयी संवाद साधतांना श्री. संजय मराठे यांनी त्यांचे वडील पंडित राम मराठे यांचा गायनाच्या माध्यमातून घडलेला साधनाप्रवास उलगडला. (स्वर्गीय) पंडित राम मराठे यांची परमेश्वरावरील दृढ श्रद्धा दर्शवणारे प्रसंग, त्यांनी संगीतात प्राविण्य मिळवण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांना आलेले आध्यात्मिक अनुभव कथन करत असतांना श्री. संजय मराठे यांची अनेकदा भावजागृती झाली. श्री. संजय मराठेकाका यांचे ते भावपूर्ण बोलणे ऐकून साधकांना आलेल्या अनुभूतींचे विश्लेषण करत ‘सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी श्री. संजय मराठेकाका यांचा आध्यात्मिक स्तर ६२ टक्के असल्यामुळे त्यांच्या गायनातून आणि वाणीतून विविध अनुभूती येतात’, असे सांगितले. या वेळी साधकांनी श्री. संजय मराठेकाका यांचे गायन चालू असतांना त्यांना आलेल्या अनुभूती आणि काकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये कथन केली. काकांनी ‘अन्य कुणाविषयी गौरवास्पद सूत्रे ऐकत आहोत’, इतक्या त्रयस्थपणे ते सर्व ऐकले.

डावीकडून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, श्री. संजय मराठे, सौ. गायत्री मराठे आणि सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

४ एप्रिल २०२२ या दिवशी श्री. संजय मराठे यांना आध्यात्मिक स्तरावर आलेल्या विविध अनुभूती

अ. ४ एप्रिल २०२२ या दिवशी मराठेकाका यांनी पहाटे ५.३० वाजता संगीताचा सराव चालू केला. तेव्हा सरावाच्या वेळी त्यांनी त्यांचे संगीतातील गुरु पंडित राम मराठे यांना आर्तनेने आळवले आणि ‘तुम्हीच येऊन माझ्याकडून हे गायन चांगल्याप्रकारे करवून घ्या’, अशी प्रार्थना केली. या वेळी त्यांनी राग ‘रामकली’ गायला. प्रार्थनेनंतर त्यांना ‘पंडित राम मराठे प्रत्यक्ष आले आहेत’, असे जाणवून त्यांची गातांना भावजागृती झाली.

आ. या दिवशी संशोधनाच्या दृष्टीने त्यांचे छायाचित्र काढले असता छायाचित्रामध्ये त्यांच्या डोक्याभोवती प्रभावळ आल्याचे दिसून आले.

इ. दुपारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात काकांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. कोणतेही पूर्वनियोजन नसतांना श्री. संजय मराठेकाका यांना ४ एप्रिल या दिवशी दिवसभरच विविध आध्यात्मिक अनुभूती आल्या. यावरून ‘हा दिवस काकांच्या प्रगतीची दैवी प्रचीतीच देत आहे’, असे जाणवले.

– कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक (संगीत विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

श्री. संजय मराठे यांच्या गायनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

१. गायनाद्वारे वातावरणातील देवतांचे तत्त्व जागृत करण्याची क्षमता असलेले श्री. संजय मराठे ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित संगीताच्या प्रयोगापूर्वी चित्रीकरणकक्षात त्रासदायक शक्तींचा दाब पुष्कळ जाणवत होता. छातीवर दडपण जाणवत होते. श्री. संजय मराठे यांनी गायन प्रारंभ केल्यावर हळूहळू त्रास उणावत गेला आणि सकारात्मकता वाढली. हे सर्व श्री. संजय मराठे यांच्या गायनातील चैतन्यामुळे झाले. ‘श्री. संजय मराठे यांच्या गायनातून जो आनंद मिळाला, यातून त्यांचे चैतन्य किती प्रमाणात कार्यरत आहे ?’, हे कळते. त्यांनी गायलेला राग ‘सामंत सारंग’ ऐकतांना वातावरणात ७० टक्के श्रीरामतत्त्व जाणवले आणि माझा रामनामाचा जप चालू झाला. त्यांनी गायलेला राग ‘चंद्रकौंस’ ऐकतांना वातावरणात ७० टक्के दत्ततत्त्व असल्याचे जाणवले आणि दत्ताचा नामजप चालू झाला. ‘श्री. संजय मराठे यांच्या गायनामुळे देवतांचे तत्त्व जागृत होऊ शकते’, एवढी त्यांची क्षमता आहे’, हे लक्षात आले.

२. श्री. संजय मराठे यांचे गायन ऐकल्यावर जवळजवळ ३ घंटे आनंदाची स्थिती टिकून होती. ‘त्यांच्या गायनाचे स्वर कानात गुंजत आहेत’, असे जाणवले. ‘चैतन्याचे कारंजे उडत आहेत’, असे जाणवले. त्यांच्या दैवी गायनामुळे माझ्या शरिरातील वेदना दूर झाल्या. – श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. ‘मन निर्विचार होऊन कार्यक्रम संपूच नये’, असे वाटत होते. – कु. मयुरी डगवार, सौ. शुभांगी, होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय)

४. श्री. संजय मराठेकाकांचे गायन चालू असतांना ‘त्यांच्याभोवती गुलाबी आणि केशरी रंगांच्या प्रभावळी एकमेकांना चिकटून आहेत’, असे दिसले. ‘श्री. संजय मराठेकाकांची प्रभावळ गुलाबी आहे, तर त्यांच्या वडिलांची प्रभावळ केशरी रंगाची आहे. त्या दोन्ही प्रभावळी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवले. – सौ. शुभांगी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. श्री. संजय मराठेकाका हे अहंकाररहित आहेत’, असे जाणवले. त्यांच्या गायनाच्या वेळी त्यांच्या ठिकाणी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराजांचे दर्शन झाले. – श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), वाद्य अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यायल, गोवा.

६. ‘श्री. संजय मराठेकाकांनी ६१ टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, असे त्यांना पाहून वाटले होते. आजच्या कार्यक्रमात काकांची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यामुळे माझ्या मनात आलेला विचार, ही या सोहळ्यासंदर्भात भगवंताने मला दिलेली पूर्वसूचना होती’, असे लक्षात आले.’ – सुश्री (कु.) कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

७. ‘श्री. संजय मराठे यांचे आराध्यदैवत भगवान शिव आहे’, हे ठाऊक नसतांनाही त्यांचे गायन ऐकणारे सद्गुरु डॉ. गाडगीळ आणि साधक यांना शिवाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

७ अ. श्री. संजय मराठे ‘रामकली’ हा राग गात असतांना ‘त्या रागात रामतत्त्व आहे’, असे जाणवले. त्याच वेळी संपूर्ण चित्रीकरण कक्षामध्ये शिवतत्त्व आकृष्ट झाल्याचे जाणवले. प्रभु श्रीरामही शिवउपासक असल्यामुळे अशी अनुभूती आली. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

७ आ. श्री. संजय मराठेकाकांचे गायन चालू असतांना मानससरोवराच्या ठिकाणी ज्याप्रमाणे दिव्य ज्योती दिसतात, त्याप्रमाणे असंख्य ज्योतींचे दर्शन झाले. त्याचसमवेत ‘हा कार्यक्रम कैलासपर्वतावर होत आहे’, असे मला जाणवले. चित्रीकरणस्थळी भगवान शिवाचे अस्तित्व जाणवले. – कु. आरती तिवारी

७ इ. श्री. संजय मराठेकाका यांचे गायन चालू असतांना मला सूक्ष्मातून नाग दिसले. – कु. मयुरी डगवार

श्री. मराठे यांची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर मराठे दांपत्याने व्यक्त केलेली कृतज्ञता !

६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे कळल्यावर श्री. संजय मराठे यांची भावजागृती झाली. ‘याविषयी मी काय बोलू ?’ असे ते म्हणाले. ‘हा सर्व गुरूंचाच आशीर्वाद आहे’, असा त्यांचा भाव होता. ‘आता मायेची ओढ राहिलेली नाही आणि आता काही करायचे राहिले नाही’, असा त्यांचा विचार असतो, असे लक्षात आले.

‘माझ्या यजमानांचा स्वभाव मुळातच शांत आहे. त्यांच्या वडिलांप्रमाणेच यजमानही दिवसभर संगीतसाधनेमध्येच मग्न असतात. गुहागरची श्री दुर्गादेवी ही आमची कुलदेवी आहे, तर श्री व्याडेश्वर हे आमचे कुलदैवत आहे. ‘यजमानांचे कल्याण व्हावे’ या उद्देशाने मी नामस्मरण आणि कुलदेवतांना प्रार्थना करते. भगवंताने आम्हाला आनंदात ठेवले आहे. आमची पुढची पिढी देखील गायनक्षेत्रातच आहे. ‘या घराण्यात येण्याचे मला सौभाग्य मिळाले’, याविषयी मी कृतज्ञ आहे.’ – सौ. गायत्री मराठे

या वेळी ‘सौ. गायत्री मराठेकाकू देखील त्यांच्या यजमानांच्या पावलावर पाऊल ठेऊन आध्यात्मिक प्रगती करत आहेत. त्यांची साधना चांगली चालू आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याचे सूत्रसंचालक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी सांगितले.

श्री. संजय मराठे यांची त्यांचे स्नेही आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१. श्री. संजय मराठे यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या वास्तूत गातांना अनुभूती येतात !  – श्री. प्रदीप चिटणीस (६१ टक्के आध्यात्मिक पातळी), संगीत अलंकार, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

श्री. प्रदीप चिटणीस

‘माझा श्री. संजय मराठे यांच्याशी गेल्या ४० वर्षांपासून परिचय आहे. संगीत हे त्यांचे जीवन आहे. संगीत हा त्यांचा श्वास आहे. ते संगीताला पूर्णपणे समर्पित आहेत. ‘संगीताविषयीच्या कुठल्याही कार्याला मला बोलवा’, असे ते आम्हाला सांगतात. संगीत सरावाच्या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या घरी अनेकदा भेटत असतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घेतो. घरी लोकांचे सतत येणे-जाणे होत असूनही त्यांची आणि त्यांच्या पत्नी सौ. गायत्री मराठे यांची आडकाठी नसते. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात गातांना जशा दैवी अनुभूती येतात, तशा प्रकारच्या अनुभूती श्री. संजय मराठे यांच्या घरातील व्यासपिठावर गातांनाही येतात. एकदा मी त्यांच्या घरी राग ‘बैरागी’ गात असतांना माझे ध्यान लागले आणि प्रभु रामरायाचे दर्शन झाले. त्यांच्यातील चैतन्यामुळेच घरातील वातावरण सात्त्विक बनले आहे.’

२. बाह्यतः आवाज बसला असूनही मराठेकाकांच्या स्वरांमधील गोडव्यामुळे साधकांची भावजागृती झाली ! – श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विशारद (तबला), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ हे सद्गुरुपदावर विराजमान आहेत’, हे जेव्हा श्री. संजय मराठे यांना कळले, तेव्हा त्यांनी सद्गुरु काकांपेक्षा स्वतः वयाने मोठे असूनही सद्गुरु काकांना नमस्कार केला. यातून श्री. संजय मराठे यांची नम्रता आणि अहंशून्यता लक्षात येते. आज गायनापूर्वी सौ. मराठेकाकूंनी मला ‘काकांचा आवाज बसला आहे’, असे सांगितले. बाह्यतः आवाज जरी बसला असला, तरी काकांच्या स्वरांमधील गोडव्यामुळे आणि चैतन्यामुळे साधकांची भावजागृती झाली.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक