काश्मीरमध्ये झेलम नदीत सापडली त्रिमुखी श्रीविष्णुची प्राचीन मूर्ती !

श्रीनगर – दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा गावात झेलम नदीच्या पात्रामध्ये त्रिमुखी श्रीविष्णुची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीमध्ये वराह, विष्णु आणि नरसिंह अशी तीन मुखे आहेत.

काही कामगार नदीपात्रातून वाळू उत्खनन करत असतांना त्यांना ही मूर्ती सापडली. त्यांनी ही मूर्ती पोलिसांकडे, तर पोलिसांनी ती जम्मू-काश्मीरच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाकडे सुपुर्द केली. यानंतर काश्मिरी हिंदूंनी ‘काश्मीरमध्ये हिंदूंची मंदिरे पूर्णत: नष्ट होण्यापूर्वी त्यांचे जतन आणि जिर्णोद्धार करावा’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.

ही ९ व्या शतकातील मूर्ती आहे ! – पुरातत्व विभाग

जम्मू-काश्मीरच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक मुश्ताक अहमद म्हणाले की, ही मूर्ती ९ व्या शतकातील असून ती अद्वितीय त्रिमुखी श्रीविष्णुची आहे. ही मूर्ती हिरव्या पाषाणातील असून अत्यंत दुर्मिळ आहे. तिची कलाकुसर अत्यंत उत्कृष्ट आहे.

झेलम नदीत सप्टेंबर २०२१ मध्येही सापडली होती श्रीदुर्गादेवीची मूर्ती !

सप्टेंबर २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील खान साहीब भागातील झेलम नदीत १ सहस्र २०० वर्षे जुनी श्रीदुर्गादेवीची मूर्ती सापडली होती. काही कामगारांना नदीपात्रात ही मूर्ती सापडली होती.