संपादकीय
गुढीपाडवा ! हिंदु नववर्षाचा मंगलमय आरंभ ! यंदाचा गुढीपाडवा हा एका मोठ्या परिवर्तनाचाही आरंभ ठरला आहे ! युक्रेन-रशिया युद्धादरम्यान भारताचा जागतिक स्तरावर असलेला दबदबा उठून दिसला. देशात धार्मिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोनातून केलेल्या राजकारणाला मतपेट्यांचाही कौल मिळत असल्याचे नुकत्याच झालेल्या निवडणुकांतून दिसून आले आहे. ‘काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद’ हा यापूर्वी दबक्या आवाजात चर्चा होत असलेला विषय आता ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या रूपाने ‘मल्टिप्लेक्स’ (अनेक चित्रपट एका ठिकाणी पहाण्याची सुविधा असलेले चित्रपटगृह) चित्रपटगृहांत पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राष्ट्रांतर्गत सामाजिक स्तरावर घडणार्या परिवर्तनाची ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. सारे विश्व मोठ्या परिवर्तनाच्या, क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत भारताच्या दृष्टीने उठून दिसणारे हे पालट हिंदूंचा हा नववर्षारंभ आनंददायी करणारे आहेत. हे संपूर्ण वर्षभरच चांगले परिवर्तन अनुभवता यावे, यासाठी क्रियाशील रहाण्यासाठी हिंदूंनीही आता कंबर कसणे आवश्यक आहे !
गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली हवी !
संतांनी भाकिते वर्तवल्याप्रमाणे वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे. चहुबाजूंनी घडणाऱ्या घटना पहाता हिंदु राष्ट्राचे पडघम वाजू लागले आहेत, हे आता ठळकपणे जाणवत आहे. चांगला काळ समीप आला असला, तरी त्याच्या प्रसववेदनाही भोगाव्या लागणार आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी युद्धाविराम घेण्यात आला, पंतप्रधान मोदी यांच्याशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे अनेक वेळा संभाषण झाले, हे सत्यच असले, तरी ‘विद्यार्थ्यांना भारतात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण का नाही मिळू शकले ?’, या कडव्या वास्तवाकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा वाढू लागला आहे, हे सत्य आहे; परंतु दबदबा केवळ मुत्सद्दी राजकारणाचा नको; तर सर्वंकष उत्कर्षाचा हवा. युक्रेनमध्ये युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याच्या मृत्यूनंतर भारतीय प्रशासनावर ताशेरे ओढले. त्याद्वारे भारतातील शिक्षणव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, रोजगार निर्मिती आणि त्यांचे समान वाटप यांतील ठळक त्रुटी समोर आल्या आहेत. देशाच्या उत्कर्षासाठी उच्च तंत्रज्ञान शिकून येणे, यात गैर नाही; मात्र भारतातील आरक्षण, प्रवेशप्रक्रियेतील अपप्रकार आदींमुळे भारतीय विद्यार्थी विदेशाची वाट धरत असतील, तर ते शोचनीय आहे. आता केवळ २ देशांत युद्ध चालू असल्यामुळे तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणणे शक्य झाले. पुढे तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल, तेव्हा आपण एकमेकांना वाचवण्याच्या स्थितीत राहू का, हा प्रश्न आहे. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राबवल्या गेलेल्या ‘ऑपरेशन गंगा’च्या घवघवीत प्रचाराला ही कडवी किनार आहे. एकेकाळी देश-विदेशातील विद्यार्थी भारतातील विश्वविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या आपल्या देशावर आता ओढवलेली ही स्थिती सुधारण्यासाठी नियतीने आपल्याला दिलेला संदेश म्हणजे ‘ऑपरेशन गंगा’ आहे ! शिक्षणव्यवस्था, त्याच्याशी निगडित प्रवेश परीक्षा, त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी यांतील त्रुटी सुधारल्या, तरी अनेक क्षेत्रांत अग्रेसर होणे आपल्याला सहज शक्य होणार आहे. कौशल्य आणि बुद्धीमत्ता असलेले भारतातील विद्यार्थी आरक्षणामुळे अन्य देशांत जात असल्याची चर्चा नेहमी होत असते. युक्रेनसारख्या छोट्याशा देशातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने तरी आपण जागृत व्हायला हवे. एकाही विद्यार्थ्याला सोयी-सुविधांच्या अभावी देशाबाहेर जावे लागू नये, अशी व्यवस्था उभारण्याच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. गुणवत्तापूर्ण शिक्षण राष्ट्राचे भवितव्य घडवते. अशा राष्ट्राचा केवळ वरपांगी दबदबा नव्हे, तर आदर केला जातो, हे वास्तव आहे.
संवेदनशीलता वाढावी !
आपण जोरकस मागणी केली, तर ती पूर्ण केली जाते, हे एव्हाना हिंदूंच्या लक्षात आले आहे. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी ‘लव्ह जिहाद म्हणजे काय ?’, असे विचारूनही काही वर्षांतच उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार त्याविरोधात कायदा करते, ज्या उत्तरप्रदेशमध्ये दंगलखोर धर्मांधांना अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत पाठीशी घातले जात होते, तेथे त्यांच्यावर कठोर गुन्हे नोंद होऊन त्यांची सार्वजनिक स्तरावर ‘छी’, ‘थू’ होण्यासाठी त्यांची छायाचित्रे चौकाचौकांत लावण्यात येतात. याचेच परिणाम उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत दिसून आले. हिंदु जागा झाला, तर काय होऊ शकते, याची ही केवळ वानगीदाखल उदाहरणे आहेत. आता काळही अनुकूल होत आहे. अशा वेळी सामाजिक उत्थानासाठी हिंदूंनी कार्य करायला हवे. मुळातच व्यापक विचारसरणी असलेल्या हिंदु समाजाला हे कठीण नाही. आवश्यकता आहे ती केवळ दिशा घेण्याची ! ती दिशाही हिंदूंनी घेतली आहे, हे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिसून आले.
काश्मीरमध्ये ९० च्या दशकात धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या नृशंस अत्याचारांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. काँग्रेसचे सरकार असते, तर हा चित्रपट प्रदर्शित करण्यातच पुष्कळ अडथळे आले असते. हिंदूंच्या एकगठ्ठा मतांची निश्चिती असल्यामुळेच यासारख्या चित्रपटाला एकप्रकारे राजाश्रय मिळाला आहे. अनेक स्वयंसेवी संघटना स्वतःहून आप्त-परिचितांना हा चित्रपट पहाण्याचे आवाहन करत आहेत. हा केवळ चित्रपट नसून एकेकाळी हिंदूंच्या एका समाजघटकाने काय भोगले आहे, त्याचे वास्तववादी चित्रण आहे. ते भोग सर्वांना कळावेत आणि समाजबंधू जागृत व्हावेत, ही तळमळ हिंदूंमध्ये दिसून येत आहे. हे निश्चितच आशादायी चित्र आहे. आपल्याला अजून पुष्कळच साध्य करायचे आहे. असे असले, तरी हिंदु समाजात अन्य समाजघटकांविषयी संवेदना जागृत होत आहेत, हे सुखावणारे चित्र आहे. आतापर्यंतच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास या संवेदनशीलतेचे पुढे राष्ट्रीयत्वाच्या जाणीवांमध्ये रूपांतर होते, असे दिसून येते. भारतीय स्वातंत्र्यापूर्वी अशी अनेक लहान-मोठी आंदोलने झाली. त्या आंदोलनांतून देशामध्ये जे परिवर्तनाचे वारे वाहू लागले, त्यामुळेच स्वातंत्र्यचळवळीला बळ आणि गती मिळाली. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. सुराज्याच्या स्थापनेची वातावरण निर्मिती होत आहे. त्याला गती देण्याचे कार्य हिंदूंनी करायचे आहे. त्यामुळेच यंदाच्या गुढीपाडव्याला आपल्याला कृतीशीलतेची, व्यापकत्वाची आणि राष्ट्रीयत्वाची गुढी उभारायची आहे !
#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष