खटल्यांची वेळेवर सुनावणी न होणे ही भारतीय न्यायव्यवस्थेतील कायमची समस्या ! – न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे

न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे

मुंबई – खटल्यांची वेळेवर सुनावणी न होणे ही भारतीय न्यायव्यवस्थेतील कायमची समस्या आहे, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे यांनी एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीच्या जामीन अर्जावर सुनावणी करतांना दोषी व्यक्तीच्या अधिवक्त्याने सुनावणीसाठी स्थगिती मागितली. तेव्हा त्यांनी वरील मत व्यक्त केले.

न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे खटले, जामिनाचे खटले आणि त्यामुळे बंदीवानांना नाहक होणारा कारावास यांमुळे न्यायव्यवस्थेला दोष दिला जातो; परंतु सुनावणीसाठी अधिवक्ते वारंवार स्थगिती मागतात. त्यामुळेच ही स्थिती निर्माण होते, अशी खंत न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे यांनी व्यक्त केली. या सुनावणीच्या वेळी सरकारी अधिवक्त्यांनी वेळ मागितला. तेव्हा न्यायमूर्तींनी त्यांनाही ‘राज्य सरकारकडून वारंवार सुनावणीस स्थगिती देण्याची मागणी केल्यास स्थगिती दिली जाणार नाही’, असे बजावले.