पुणे येथील ‘प्राज्ञ पाठशाळे’चा ‘धर्मकोश’ प्रकल्प आर्थिक अडचणीत !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – धर्म ही संकल्पना सर्वार्थाने उलगडून सांगण्यासाठी वाईच्या ‘प्राज्ञ पाठशाळे’च्या वतीने चालू असलेला ‘धर्मकोश’ प्रकल्प आर्थिक अडचणीत सापडला आहे. धर्मशास्त्रीय संदर्भाच्या आधारे प्राचीन भारतीय न्याय आणि शासन व्यवस्थेचा विकास सर्वांसमोर आणणे अशी या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. निधी उपलब्धतेसाठी ‘प्राज्ञ पाठशाळे’कडून संस्था आणि शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून, तातडीने निधी उपलब्ध न झाल्यास ३१ मार्चनंतर प्रकल्प बंद करण्याची वेळ येणार आहे, असे ‘प्राज्ञ पाठशाळे’च्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ संस्कृततज्ञ डॉ. सरोजा भाटे यांनी सांगितले.

प्रकल्पाची उद्दिष्टे

१. धर्मशास्त्रामध्ये अंतर्भूत होणाऱ्या सर्व विषयांचे कालानुक्रमे सर्व संदर्भ संस्कृत वाङ्मयातून एकत्र करणे, मूळ श्रुतीस्मृतींची वचने, त्यावरील भाष्य, टीका, शास्त्रार्थ यांचे संकलन करणे, या संग्रहाच्या आधारे आजमितीस धर्म या संकल्पनेच्या रूढ झालेल्या संकुचित अर्थाच्या पलीकडे असणारे धर्माचे सर्वसमावेशक आणि विश्वात्मक रूप लोकांसमोर आणणे.

२. धर्म हा केवळ उपासनापद्धती, संप्रदाय यांपुरताच मर्यादित नसून आचार, कायदा, राजनीती, शासनपद्धती या विषयांना तो कसा कवेत घेतो, धर्म प्रत्येक वर्गासाठी समान आहे, हे विशद करणे.

३. धर्मकोशामध्ये व्यवहारकांड, संस्कारकांड, राजनीतिकांड, वर्णाश्रमधर्मकांड अशी एकूण ११ कांडे आहेत. धर्मकोशाच्या संगणकीकरणाचेही काम चालू आहे. धर्मकोशाचे सर्व खंड ‘डिजिटल’ पद्धतीने अभ्यासक, संशोधकांना आणि विक्रीसाठीही उपलब्ध करण्याचे नियोजन आहे; मात्र यासाठी निधीची आवश्यकता आहे.