सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात केलेल्या कारवाईत ७ सहस्र किलो गोमांस जप्त !
|
पुणे – इंदापूर कसाई मोहल्ल्यात २७ मार्च या दिवशी मोठ्या प्रमाणात गायी आणि बैल कापत असल्याची माहिती मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळताच त्यांनी तात्काळ वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कारवाई करण्याची विनंती केली. त्या वेळी पोलिसांनी इंदापूर कसाई मोहल्ल्यात धाड टाकली असता १ टेम्पो, ३ गायी आणि वासरे कापलेल्या अवस्थेत मिळाली. या वेळी कारवाई करत असतांना गोमाफियांनी मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट आखला होता. या गोष्टीची कल्पना मिळताच पोलिसांनी तो कट उधळून लावत टेंभुर्णीपासून स्वामींना पुरेसा पोलीस बंदोबस्त देऊन सुखरूप घरी पोचवले.
पोलिसांची चाहूल लागताच कसायांनी टेंभुर्णीच्या दिशेने पळवलेला आयशर टेम्पो टेंभुर्णी पोलिसांच्या साहाय्याने कह्यात घेण्यात यश मिळाले. त्या वेळी त्या आयशर टेम्पोचा क्रमांक पुढील आणि मागील बाजूस वेगवेगळा असल्याचे पोलिसांना आढळून आले. इंदापूर कसाई मोहल्ला आणि टेंभुर्णी या ठिकाणचे गोमांस जप्त करून गायी आणि बैल कापणारे, गाडी चालक-मालक, तसेच गोमांस विकत घेणारे यांवर गुन्हा नोंद केला असून सर्व गोमांस नष्ट केले आहे. या कारवाईत प्रतीक भेगडे, श्रेयश शिंदे, आशुतोष मारणे इत्यादी गोरक्षकांनी सहभाग घेतला. (गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना अवैधरित्या गोवंशियांची हत्या केली जात आहे, तसेच गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत, हे संतापजनक ! वाहनचालक आणि वाहन यांच्यापेक्षा सूत्रधारांवरच कडक कारवाई करून गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. – संपादक)