‘हलाल मांस’ हा ‘आर्थिक जिहाद’ !

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांची स्पष्टोक्ती

हिंदु जनजागृती समितीसह अन्यही हिंदुत्वनिष्ठांनी वेळोवेळी ‘हलाल’ प्रकाराविषयी जनजागृती केली आहे. तेव्हाच जर सरकारने या प्रकाराची सखोल चौकशी केली असती, तर अशा गोष्टींना चाप बसला असता ! आता तरी सरकारने याविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – हलाल मांस हा एक ‘आर्थिक जिहाद’ आहे. याचा अर्थ मुसलमानांनी इतरांशी व्यापार करू नये. यासाठीच त्याचा ‘जिहाद’ म्हणून वापर केला जात आहे. हे लादण्यात आले आहे. ‘हलाल मांसच वापरावे’ असे त्यांना जेव्हा वाटते, तेव्हा ‘ते वापरू नका’ असे सांगण्यात अयोग्य काय आहे ?, असा प्रश्‍न भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी हलाल मासांविषयी उपस्थित केला. कर्नाटकमध्ये हिजाबनंतर आता हलाल मांसांवरून वाद चालू झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना रवि बोलत होते.

मुसलमान हिंदूंकडून मांस खरेदी करण्यास नकार देतात, तर हिंदूंनी मुसलमानांकडून मांस का खरेदी करावे ?

सी.टी. रवि पुढे म्हणाले की, त्यांच्या (मुसलमानांच्या) देवाला हलाल मांस अर्पण केले जाते. अशा परिस्थितीत हिंदूंसाठी हे मांस कुणाच्या तरी उरलेल्या अन्नासारखे आहे. जेव्हा मुसलमान हिंदूंकडून मांस खरेदी करण्यास नकार देतात, तेव्हा तुम्ही हिंदूंना मुसलमानांकडून मांस खरेदी करण्यास का सांगत आहात ? हा व्यवसाय एकतर्फी नसून दोन्ही बाजूंनी चालतो. जर मुसलमानेतर हलाल मांस खाण्यास सिद्ध असतील, तरच हिंदू हलाल मांस घेतील.

आम्हाला संपूर्ण अभ्यास करावा लागेल ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

हा विषय आताच चालू झाला आहे. आम्हाला संपूर्ण अभ्यास करावा लागेल; कारण त्याचा कोणत्याही नियमांशी काहीही संबंध नाही.  युगादीनंतर (हिंदु नववर्षानंतर) मांस खाणे, ही एक प्रथा आहे. आता त्यावर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. आम्ही याविषयी पाहू, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर व्यक्त केली. मुख्यमंत्री बोम्माई पुढे म्हणाले, ‘‘आम्ही आमची भूमिका नंतर कळवू. विविध संघटना आपापल्या मोहिमा राबवणार आहेत. आम्ही काय प्रतिसाद द्यायचा आणि काय नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. जेथे आवश्यक असेल, तेथे आम्ही प्रतिसाद देऊ.’’

राज्यातील वातावरण बिघडण्याविषयी मुख्यमंत्री बोम्माई यांना विचारले असता ते  म्हणाले, ‘‘अशा गोष्टींनंतरही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अन् सौहार्दपूर्ण वातावरण बिघडलेले नसल्याचे मी पाहिले आहे. भविष्यात आपण याची काळजी घेऊ.

(म्हणे) ‘हिंदु तरुणांनी राज्यातील वातावरण बिघडवू नये !’ – माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी

कुमारस्वामी यांनी असे आवाहन हिजाब प्रकरणात केल्याचे ऐकिवात नाही ! – संपादक

माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते एच्.डी. कुमारस्वामी यांनी हलाल मांस प्रकरणाचा निषेध केला आहे. कुमारस्वामी म्हणाले की, मला सरकारला विचारायचे आहे की, तुम्हाला हे राज्य कुठे घेऊन जायचे आहे ? मी हिंदु तरुणांना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी राज्यातील वातावरण बिघडवू नये.

दुसरीकडे राज्यातील ६१ पुरोगामी विचारवंतांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना पत्र लिहून धार्मिक द्वेष रोखण्याचे आवाहन केले आहे. ‘राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक द्वेष निर्माण करणे लज्जास्पद आहे’, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

कर्नाटकातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ‘उगाडी’ (हिंदु नववर्ष) सणानंतर हलाल मांस घेऊ नका’, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘उगाडी’च्या एक दिवसानंतर हिंदू देवाला मांस अर्पण करतात आणि नवीन वर्ष साजरे करतात.

‘हलाल’ मांस म्हणजे काय ?

हलाल पद्धतीचे मांस मिळण्यासाठी प्राण्याचे तोंड मक्केच्या दिशने करून त्याच्या गळ्याची नस चिरली जाते आणि प्राण्याला सोडून दिले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त वहाते आणि नंतर त्या प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो.

झटका मांस म्हणजे काय ?

हिंदु, शीख आदी भारतीय धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्याची हत्या केली जाते. यामध्ये प्राण्याची मान एकाच वारमध्ये कापली जाते. यामुळे प्राण्याला अल्प प्रमाणात त्रास होतो.