पेट्रोल आणि डिझेल यांचा प्रतिलिटर दर २० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता ! – अहवाल

गेल्या ८ दिवसांत दरात सातव्यांदा वाढ !

नवी देहली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खाली येऊ लागल्या असल्या, तरी गेल्या ८ दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात वाढ चालूच आहे. भारतीय तेल आस्थापनांचा मागील ५ मासांत झालेला अब्जावधी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी इंधन तेलाच्या किंमती लिटरमागे २० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘क्रिसिल रिसर्च’ नावाच्या एका संस्थेने प्रसारित केलेल्या अहवालातून हे समोर आले आहे.

२९ मार्च या दिवशी मुंबईत पेट्रोलच्या दरात ८५ पैशांनी, तर डिझेलच्या दरात ७५ पैशांनी वाढ झाली. देहलीत हेच दर अनुक्रमे ८० पैसे आणि ७० पैसे होते. गेल्या ८ दिवसांत सातव्यांदा ही वाढ करण्यात आली आहे.

अलीकडेच ‘मूडीज् रेटिंग एजन्सी’ने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात सांगण्यात आले होते की, भारतीय तेल आस्थापनांनी नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत २.२५ अब्ज डॉलर्सचा, म्हणजे १९ सहस्र कोटी रुपयांचा महसूल गमावला आहे. त्यामुळेच ही दरवाढ
करण्यात येत आहे.

पेट्रोलियम उत्पादने वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणावीत !

‘पी.एच्.डी. चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष प्रदीप मुलतानी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पेट्रोलियम उत्पादने वस्तू आणि सेवा कराच्या (‘जी.एस्.टी.’च्या) कक्षेत आणल्यास पुष्कळ साहाय्य होईल. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले असेल. दिवसेंदिवस ज्या प्रकारे किंमती वाढत आहेत, त्यावरून आता पेट्रोल आणि डिझेल यांना ‘जी.एस्.टी’च्या कक्षेत आणावे लागेल.