साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या ! – काशिनाथ प्रभु, धर्मप्रचारक, सनातन संस्था

बेंगळुरू येथे दोन दिवसांची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ पार पडली !

बेंगळुरू (कर्नाटक) – मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. समाजात धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज मनुष्य अर्थ आणि काम या सुखात बुडाला आहे. तेच सुख आहे, असे समजून त्याच्या मागे-मागे जाऊन शेवटी अनमोल असा मनुष्य जन्म व्यर्थ घालवत आहे. साधना केल्यास जीवनात येणार्‍या अडचणींपैकी ८० टक्के समस्यांना उत्तर मिळतेच; म्हणून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू येथील मल्लेश्वरम् संस्कृती केंद्रात १९ आणि २० मार्च २०२२ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’त ते बोलत होते. या कार्यशाळेत अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत हिंदु जनजागृती समितीचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनीही मार्गदर्शन केले.

धर्मप्रेमींचे अभिप्राय

१. सौ. तारा सिंग, बेंगळुरू – हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेविषयी काहीच समजले नव्हते. या कार्यशाळेमुळे संसारापेक्षा देशासाठी समर्पित होणे श्रेष्ठ असल्याची जाणीव झाली.

२. श्री. रवी, कोलार – सनातन संस्थेच्या इतकी दुसरी कोणतीही श्रेष्ठ संस्था नाही. अन्य संस्थांमध्ये केवळ एकाच विषयाचे ज्ञान मिळते; परंतु सनातनमध्ये आल्यावर वेद, उपनिषद, १८ पुराणे, समग्र रामायण, महाभारत सर्व विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त होते. सनातनच्या कार्याचे शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे.

३. श्री. पवन कुमार, बेंगळुरू – सनातन संस्थेविषयी थोडी माहिती होती; परंतु इतके सखोल कार्य करत असल्याचे प्रत्यक्ष पहायला आणि शिकायला मिळाले. इथे प्रत्येक गोष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात येते. सनातन संस्थेच्या संपर्कात असणे, हेच आमचे परम भाग्य आहे.

४. श्री. श्याम नायक, बेंगळुरू – ‘नालंदा विश्वविद्यालय कुठे आहे ?’, असे कुणी विचारल्यास त्यांना ‘ते म्हणजे सनातन संस्था !’, असे मी सांगू शकतो.