‘हिंदु धर्मात गायीचे पूजन केले जाते’, असे असतांना नागराज मंजुळे यांनी हिंदु धर्माचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवंश हत्या होऊ न देता गोवंश जपण्याचा आदर्श ठेवला. आज त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत गोवंश हत्या बंदीला विरोध केला जात आहे. ज्या बहुसंख्य हिंदूंना चित्रपट दाखवून पैसे कमावले जातात, त्याच हिंदूंच्या धर्मावर टीका करणार्या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार टाकला, तर चुकीचे काय ? – संपादक
पुणे – शाकाहारी, मांसाहारी ही कल्पना फक्त भारतातच आहे. काही समाजांमध्ये परिस्थितीमुळे मांसाहार करावा लागतो. आपल्याकडे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे, काही दिवसांनी श्वास घेण्यावर बंदी घातल्यास आश्चर्य वाटायला नको, असे वक्तव्य दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. पुण्यात शहीद भगतसिंह स्मृतीदिनानिमित्त ‘भगतसिंह विचारमंच’ने नास्तिक मेळावा आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माणूस जन्मतःच नास्तिक असतो. वैफल्यग्रस्त लोकांनाच देवाची आवश्यकता असते. तर्क लावून विचार करणार्या लोकांना देवाची आवश्यकता नसते. (‘वैफल्यग्रस्त लोकांना देवाची आवश्यकता असते’, हा नागराज मंजुळे यांचा जावईशोधच म्हणावा लागेल. – संपादक) आपल्या देशात देव आणि धर्म यांच्या नावाने पुष्कळ हिंसा आणि रक्तपात झाला आहे; परंतु एका नास्तिकाला काफिर, दारूडे आणि वाईट असल्याच्या अफवा पसरवल्या जातात.