हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणार्‍या खात्यांवर ट्विटरकडून कारवाई का केली जात नाही ? – देहली उच्च न्यायालयाचा संतप्त प्रश्न

नवी देहली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावर आक्षेप घेऊन ते बंद करणार्‍या ट्विटरकडून हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणार्‍या खात्यांवर कोणतीच कारवाई का केली जात नाही ? असा संतप्त प्रश्न देहली उच्च न्यायालयाने ट्विटर आस्थापनाला विचारला आहे. देहलीचे मुख्य न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपिठाने ट्विटरला धारेवर धरत म्हटले की, ट्विटरला जे ‘संवेदनशील’ वाटते, त्याच्या विरोधातच ते कठोर कारवाई करते आणि हिंदु धर्माला अपमानित करणार्‍या खात्यांवर काहीच कारवाई करत नाही. हे अत्यंत संतापजनक आहे.

‘जर अन्य धर्मियांच्या भावनांसंदर्भात कुणी आक्षेपार्ह ट्वीट्स केले असते, तर तुम्ही अधिक गंभीर राहिला असता’, असेही न्यायालयाने ट्विटरला सुनावले. उच्च न्यायालयाने ट्विटरवरील खाती कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भातील ट्विटरचे धोरण स्पष्ट करण्याविषयी उत्तर मागवले आहे. न्यायालयाने केंद्र सरकारलाही त्याद्वारे ट्विटरवरील खाती बंद करण्यासंदर्भात प्रक्रिया निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.