महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक उपचारांवर संशोधन स्वउपचार हाच उपचारांचा शाश्वत प्रकार आहे ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, रामनाथी, गोवा

आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर

श्री. शॉन क्लार्क

मुंबई – स्वउपचार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनायला हवा; कारण आपल्या समस्या ज्या शारीरिक किंवा मानसिक वाटतात, त्यांचे मूळ कारण आध्यात्मिक असते आणि त्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांनीच सुटू शकतात. स्वत:वर उपाय करण्यासाठी दुसर्‍या उपचारकर्त्याला सांगणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे स्वउपचार करणे, हाच त्यावर शाश्वत पर्याय आहे, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. १५ मार्च २०२२ या दिवशी ‘टुमॉरो पीपल ऑर्गनायझेशन, बेलग्रेड, सर्बिया’ (Tomorrow People Organization, Belgrade, Serbia) यांनी बँकॉक, थायलंड येथे ‘अध्यात्म आणि मानसशास्त्र’ याविषयी आयोजित केलेल्या ७ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री. शॉन क्लार्क यांनी ‘प्रत्येक व्यक्ती उपचारकर्ता बनू शकते का ? तसेच आध्यात्मिक उपचार करतांना घ्यावयाची काळजी !’, याविषयी संशोधन सादर केले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेला हा ८९ वा शोधनिबंध होता.

या वेळी श्री. शॉन क्लार्क यांनी सांगितले की,

१. उपचारांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी आध्यात्मिक त्रास असलेली एक व्यक्ती आणि संशोधन केंद्रातील एक व्यक्ती यांच्या प्रभावळी ‘प्रभावळ-मोजक’ यंत्राचा (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) उपयोग करून उपचारांपूर्वी आणि उपचारांनंतर मोजल्या.

२. पहिल्या दिवशी जगभर प्रचलित उपचारतज्ञांच्या पद्धती वापरल्या, जसे हातांच्या हालचाली आणि मुद्रा करणे, श्वेत प्रकाशाचे उपाय, प्रार्थना आणि देवाला आळवणे. या प्रकारे उपचार झाल्यानंतर व्यक्तीची सकारात्मक प्रभावळ ९.०७ मीटर वरून २०.५४ वाढली आणि तिची नकारात्मक प्रभावळ १४.१७ पासून ४.४० मीटर पर्यंत घटली.

३. दुसर्‍या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र अन् आश्रम येथे शिकवल्या जाणार्‍या प्रभावी आध्यात्मिक स्तरावरील उपचारपद्धतींनी उपचार केले. यांमध्ये ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप करणे, देवाला शरणागतभावाने प्रार्थना करणे, गोमूत्रमिश्रित पाणी शिंपडणे, आश्रमातील सात्त्विक उदबत्त्यांनी ओवाळणे, भीमसेनी कापूर पेटवून व्यक्तीभोवती ओवाळणे अन् पवित्र विभूती फुंकरणे यांचा समावेश होता.  तसेच उपचारकर्त्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हस्ताक्षर असलेला कागद व्यक्तीच्या हातात धरायला दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत ऐकवली. या व्यक्तीला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने ती यांतील उच्च सकारात्मक स्पंदने सहन करू शकली नाही.

४. यातून लक्षात येते की, हे आध्यात्मिक स्तरावरील उपचार पुष्कळच प्रभावी आहेत. उपचारांपूर्वी व्यक्तीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १४.१६ मीटर होती आणि उपचारांनंतर ती २३.३० मीटर झाली. तसेच उपचारांपूर्वी व्यक्तीतील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ६.३५ मीटर होती, उपचारांनंतर ती घटून १.७८ मीटर झाली. उपचार करणारा आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असूनही उपचार सत्रानंतर त्याच्यामध्ये मात्र नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यावरून लक्षात येते की, असे उपचार करणे किती धोकादायक असू शकते, मुख्यत्वेकरून अशा उपचारकर्त्यांना जे ते प्रतिदिन करतात किंवा ज्यांची आध्यात्मिक पातळी अधिक नाही अथवा ज्यांना उच्च पातळीच्या संतांचे आध्यात्मिक संरक्षण नाही.

५. दुसर्‍यावर उपचार करून सूक्ष्म नकारात्मक शक्तींपासून रक्षण होण्यासाठी उपचारकर्त्याजवळ आध्यात्मिक बळ असायला हवे आणि देवाची शक्ती प्राप्त करण्याची क्षमता हवी. आध्यात्मिक त्रास असलेल्या किंवा पुरेसे आध्यात्मिक बळ नसलेल्या उपचारकर्त्यामुळे व्यक्तीवर उपचार होण्याऐवजी तिच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सुचवलेली सर्वांत योग्य पद्धत म्हणजे स्वउपचार पद्धती ! याअंतर्गत आताच्या काळासाठी उपयुक्त ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप करणे, मीठ-पाण्याचे उपचार, रिकाम्या खोक्यांचे उपचार, नारळाने दृष्ट काढणे इत्यादी उपचार करावेत.