ईडीकडून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची संपत्ती कह्यात !

मुंबई – आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्यानुसार शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने कह्यात घेतली आहे. एन्.एस्.ई.एल्. आर्थिक घोटाळा प्रकरणात ही कारवाई केली आहे. यामध्ये सरनाईक यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि काही भूमी कह्यात घेण्यात आली आहे.

वर्ष २०१३ मध्ये या घोटाळ्याच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. ईडीने केलेल्या अन्वेषणामध्ये आस्था ग्रुपकडे एन्.एस्.ई.एल्.ची २४२ कोटी रुपये थकबाकी होती. आस्था ग्रुपने २१ कोटी ४ लाख रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रकल्पासाठी दिले. त्यापैकी ११ कोटी ३५ लाख रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. ही दोन्ही आस्थापने प्रताप सरनाईक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली. या घोटाळ्याच्या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३ सहस्र २४२ कोटी ७६ लाख रुपये कह्यात घेण्यात आले आहेत.