येत्या २९ मार्चपासून काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर नियमित सुनावणी होणार !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने येत्या २९ मार्चपासून काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादाच्या प्रकरणी नियमित सुनावणी करण्याचा आदेश दिला आहे. वाराणसी येथील अंजुमन इंतेजामिया मशिदीकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सर्वेक्षणावर यापूर्वीच स्थगिती आणली आहे.

सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारच्या अधिवक्त्यांनी म्हटले की, येथे प्राचीन काळापासून, म्हणजेच सत्ययुगापासून शिवमंदिर अस्तित्वात असून ते स्वयंभू आहे. ते अजूनही त्या ठिकाणी विद्यमान आहे. या मंदिराचे तळघर अद्यापही वादीच्या नियंत्रणात आहे, जे १५ व्या शतकातील मंदिराचा भाग आहे. यासह १५ ऑगस्ट १९४७ ला ज्या स्थितीला ते होते, त्याच स्थितीला ते अद्यापही आहे. त्यामुळे याला ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा लागू होत नाही.