श्रीलंकेत १ किलो तांदूळ तब्बल ५०० रुपयांना, तर १ किलो साखरेसाठी मोजावे लागणार २९० रुपये !

महागाई वाढली ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

कोलंबो (श्रीलंका) – आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेमध्ये खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेचे आता कंबरडे मोडले आहे.

प्रतिकिलो तांदूळ तब्बल ५०० श्रीलंकी रुपयांचा (१३२ भारतीय रुपयांचा) झाला असून केवळ ४०० ग्रॅम मिल्क पावडर विकत घेण्यासाठी तेथील जनतेला ७९० रुपये (२०९ भारतीय रुपये) मोजावे लागत आहेत. गेल्या ३ दिवसांत मिल्क पावडरची किंमत २५० रुपयांनी वाढली आहे. एक किलो साखरेसाठी जनतेला २९० रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे तेथील जनता आश्रयासाठी भारतात येत आहे. लवकरच २ सहस्र श्रीलंकन नागरिक भारतात येतील, असा अंदाज गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवला आहे.