रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाचे प्रतिरूप असणार्‍या पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांच्या घरी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि सिंगबाळ कुटुंबातील व्यक्तींची जाणवलेली भाववैशिष्ट्ये !

४.२.२०२२ या श्री गणेश जयंतीच्या दिवशी फोंडा, गोवा येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांच्या घरातील श्री गणेश आणि श्री अन्नपूर्णामाता यांच्या मूर्ती पालटून नवीन मूर्ती स्थापन केल्या. तेव्हा पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांची पूजा केली. त्यानंतर ७.२.२०२२ या रथसप्तमीच्या दिवशी आम्हा काही साधकांना त्या मूर्तींचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

डावीकडून श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ, पू. नीलेश सिंगबाळ, पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सुश्री (कु.) कला खेडेकर

१. भूवैकुंठातील स्पंदनांची अनुभूती देणारे पू. सुधा सिंगबाळआजी यांचे घर !

कु. वैष्णवी वेसणेकर

अ. आम्ही रामनाथी आश्रमातून चारचाकीने पू. नीलेश सिंगबाळ यांच्या घरी गेलो. तेव्हा ‘रामनाथी आश्रमातून पुन्हा रामनाथी आश्रमातच प्रवेश केला आहे’, असे मला जाणवले.

आ. हे साक्षात् महालक्ष्मीचे (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे) निवासस्थान असल्यामुळे तेथे निश्चितच भूवैकुंठाची स्पंदने कार्यरत असणारच ! मला घरात पुष्कळ सकारात्मक स्पंदने आणि ऊर्जा जाणवली. मला तेथील वातावरणात वेगळाच हलकेपणा जाणवत होता.

(‘महर्षींनी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या महालक्ष्मीस्वरूप आहेत’, असे सांगितले आहे.’ – संकलक)

२. देवघरात स्थापन केलेल्या श्री गणेश आणि श्री अन्नपूर्णादेवी या मूर्तींचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. ‘देवघरातील मूर्तींतून चैतन्य आणि तेज यांचा स्रोत प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : देवघरातील श्री गणेश आणि श्री अन्नपूर्णादेवी यांच्या मूर्ती पुष्कळच तेजस्वी दिसत होत्या. त्या दोन्ही मूर्तींकडे पहातांना ‘चैतन्य आणि तेज यांचा मोठ्या प्रमाणात स्रोत प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. ‘मूर्तींचे दर्शन घेणार्‍या साधकांकडे तो स्रोत वेगाने प्रक्षेपित होऊन प्रत्येकाला साधना करण्यासाठी आणि आपत्काळात तरून जाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करत आहे’, असे मला वाटले.

२ आ. आम्ही काही साधकच घरी दर्शनासाठी जाऊ शकलो; पण ‘आम्ही केवळ प्रतिकात्मकच आहोत. प्रत्यक्षात सर्वच साधकांना ती ऊर्जा प्राप्त झाली आहे’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.

३. सिंगबाळ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीतील प्रीतीचे घडलेले दर्शन

३ अ. पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दारातच साधकांचे प्रेमाने स्वागत करणे आणि घरात रामनाथी आश्रमाची स्पंदने जाणवल्याने सर्वांची भावजागृती होणे : आम्ही त्यांच्या घराच्या इमारतीजवळ पोचलो. श्री. सोहम् सिंगबाळ आम्हाला घेण्यासाठी खाली येऊन थांबला होता. घरात प्रवेश करताच तेथे पू. नीलेशदादा आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आमची वाट पहात दारातच उभ्या होत्या. त्यांनी अत्यंत प्रेमाने आमचे स्वागत केले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘गुरूंच्या लहान आश्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत !’’ त्यांच्या या बोलण्याने आम्हा सर्वांची पुष्कळ भावजागृती झाली. खरेतर ‘त्यांच्या बोलण्याने झालेल्या संकल्पामुळेच आम्हाला तेथे रामनाथी आश्रमाची स्पंदने अनुभवता आली’, असे म्हणता येईल.

३ आ. त्या दिवशी श्रीमती सिंगबाळआजी यांचा संत सन्मानसोहळा आयोजित केला होता. तो सन्मानसोहळा अगदी एका कौटुंबिक सोहळ्यासारख्या पार पडला. त्यात कुठेही औपचारिकता जाणवली नव्हती. सोहळ्याच्या वेळी आम्हीही त्या कुटुंबाचे सदस्यच बनून गेलो होतो.

३ इ. साधकांना प्रेमाने शिरा खाऊ घालणे : ‘साधक घरी येणार’, हे कळताच लगेच सुश्री (कु.) कला खेडेकर यांनी प्रेमाने साधकांसाठी शिरा बनवला. त्यात त्यांच्यातील प्रीतीची मधुर चव उतरली होती. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘तुम्ही येणार’, हे थोडे आधी कळले असते, तर मी तुमच्यासाठी पुरी-भाजीचे जेवण बनवले असते. आता पुढच्या वेळी जेवायलाच या.’’ सोहळा झाल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सुश्री कलाताई साधकांना आग्रहाने वाढत होत्या.

३ ई. पू. सिंगबाळआजींना शारीरिक त्रास होत असूनही त्यांनी साधकांची प्रेमाने विचारपूस करणे : पू. सिंगबाळआजींना तीव्र शारीरिक त्रासांमुळे फार वेळ बसणे शक्य होत नव्हते, तरीही त्या साधक आल्यापासून ते जाईपर्यंत, म्हणजे साधारण साडेतीन घंटे साधकांच्या समवेत बसून होत्या. त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करत होत्या.

४. सिंगबाळ कुटुंबियांची आध्यात्मिक स्तरावर झालेली भेट

सिंगबाळ कुटुंबियांच्या घरी सर्वांची अपार प्रीती लाभल्यामुळे मिळालेला अनुभव आध्यात्मिक स्तरावरचा होता. आश्रमात आल्यानंतरही पुष्कळ वेळपर्यंत मला तो आनंद अनुभवता येत होता. असा अनुभव आणि आनंद मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. यातून संतांची प्रीती आणि त्यासह सिंगबाळ कुटुंबाचे सर्वांना प्रेमाने जोडून ठेवण्याचे आध्यात्मिक वैशिष्ट्य लक्षात आले.

श्री गुरूंनी दिलेल्या या दिव्य अनुभवाबद्दल त्यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !

– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक