वाराणसी येथील १२६ वर्षीय योगगुरु स्वामी शिवानंद यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान !

नवी देहली – वाराणसी येथील १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना २१ मार्च या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला. या वेळी योगगुरु शिवानंद यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाकून नमस्कार केला. या वेळी पंतप्रधान आणि राष्ट्रपती या दोघांनीही योगगुरु शिवानंद यांना नमस्कार केला. या सोहळ्यासाठी स्वामी शिवानंद अनवाणी आले  होते. (वयस्कर आणि एका क्षेत्रात मोठे कार्य केलेले असतांना इतक्या नम्रतेने नतमस्तक होणार्‍या ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध योगगुरूंकडून राजकारण्यांसह प्रत्येकाने शिकले पाहिजे ! – संपादक) या कार्यक्रमात ४ जणांना ‘पद्मविभूषण’, १७ जणांना ‘पद्मभूषण’ आणि १०७ जणांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.