भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका अल्प आहे ! – पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर

लोकांनी वेगाने लसीकरण करून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे !

पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर

नागपूर – भारतात ‘ओमायक्रॉन’ची तिसरी लाट असतांनाच सर्वसाधारणपणे १०० पैकी ७५ जणांना ‘बीए.२’ या नव्या व्हेरिएंटची लागण होऊन गेलेली आहे. चीनमध्ये १ मासानंतर स्थिती स्पष्ट झाल्यानंतरच कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी नेमकेपणाने सांगता येईल. भारताला सध्या तरी चौथ्या लाटेचा धोका दिसत नाही, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी १९ मार्च या दिवशी येथे दिली.

ते पुढे म्हणाले की, चीनमध्ये सध्या नव्या व्हेरिएंटमुळे २ मृत्यू झाले असून अनुमाने याचे ५ सहस्र रुग्ण आहेत. आपल्याला चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून रहावे लागेल. १ मासानंतर चीनमधील नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल. चीनमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपल्याला काळजी करण्याची परिस्थिती राहील. ऐकीव माहिती वा अफवा यांवर विश्वास न ठेवू नका. लोकांनी घाबरून न जाता, तसेच दिरंगाई न करता वेगाने लसीकरण करून कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वुहान विषाणूनंतर ‘डी-६१४’ विषाणू आला. त्याचा सर्वत्र संसर्ग झाला. त्यानंतर अल्फा, बीटा आणि डेल्टा विषाणू आला. प्रति ४-६ मासांनी १ कुठला तरी नवीन ‘म्यूटंट’ येणारच आहे. आपण काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे. चीनने ‘झिरो कोरोना ट्रान्समिशन पॉलिसी’ लावली होती. आपल्याकडे संसर्ग असलेला परिसर तेवढा बंद करत होतो. जगात जहाज आणि विमान वाहतूक चालू असते. त्यामुळे संसर्ग पसरू न देणे सध्याच्या घडीला कठीण आहे. हे लक्षात घेता प्रत्येकाने काळजी घेणे हेच चांगले आहे, असे गंगाखेडकर यांनी सांगितले.