सोलापूर येथे दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा उत्साही वातावरणात प्रारंभ !
सोलापूर, १९ मार्च (वार्ता.) – पाच पांडवांच्या पाठिशी साक्षात् श्रीकृष्ण होते, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठिशी भवानीमातेचा आशीर्वाद होता. छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी त्यांचे राज्य ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणून आणि ते राज्य म्हणजे ‘श्रींचे’ राज्य म्हणून चालवत होते. आपल्याला यापुढील काळात जे हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यातील पहिली पायरी साधना आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे आवश्यक अधिष्ठान साधनेतूनच निर्माण होणार आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या १९ मार्च या दिवशी टाकळीकर मंगल कार्यालयात दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
या कार्यशाळेत सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांतील ८० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले आहेत. प्रारंभी शंखनाद झाल्यावर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी पू. (कु.) दीपाली मतकर आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी केले. कार्यशाळेचा उद्देश हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी सांगितला. दोन दिवसांच्या कार्यशाळेत धर्मप्रेमींना साधना, हिंदु राष्ट्र, आदर्श वक्ता कसे व्हावे, संपर्क कसा करावा यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.
उपस्थित मान्यवर – सोलापूर महापालिकेच्या भाजप नगरसेविका सौ. राधिका पोसा, डॉ. विष्णु चव्हाण
या वेळी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये म्हणाल्या…
१. भारतात हिंदूंसाठी कार्य करणार्या अनेक संघटना असूनही अपेक्षित असे हिंदूंचे संघटन नाही. याच्या मुळाशी जाऊन विश्लेषण केल्यास धर्मशिक्षणाचा अभाव आहे, हेच लक्षात येते.
२. हिंदू संघटित असते, तर वर्ष १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदु पंडितांवर अत्याचार झालेच नसते.
३. धर्मशिक्षणाअभावी हिंदूंनी स्थिती इतकी वाईट आहे की, त्यांना नमस्कार कसा करावा ? हेही ठाऊक नाही. ऋषिमुनींनी सांगितलेले धर्मशास्त्र समजून घेऊन साधना केल्यास आपल्याला ईश्वरप्राप्ती निश्चित होऊ शकते.
४. सत्ययुगात सात्त्विकता पुष्कळ होती, तर कलियुगात सात्त्विकता अल्प असल्याने भक्तीयोगच महत्त्वाचा आहे. त्यासाठी साधनेतील पहिला टप्पा म्हणजे प्रत्येकाने कुलदेवतेचा नामजप करणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे
१. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये विषय सांगत असतांना ‘प्रोजेक्टर’द्वारे त्याची छायाचित्रे दाखवण्यात येत होती, तसेच पू. (कु.) दीपाली मतकर याही फलकावर विविध सूत्रे लिहून दाखवत होत्या. त्यामुळे धर्मप्रेमींना विषय समजणे सोपे जात होते.
२. सर्व धर्मप्रेमींचे स्वागत करणारा वैशिष्ट्यपूर्ण फलक स्वागत कक्षात लावला होता.
३. व्यासपिठावरून वक्ते विषय सांगत असतांना अनेक धर्मप्रेमी विषय जिज्ञासेने ऐकत होते आणि लिहून घेत होते. धर्मप्रेमी मध्ये मध्ये देत असलेल्या ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणांमुळे सभागृहातील वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होत होता.
पहिले सत्र झाल्यावर काही धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले वैशिष्ट्यपूर्ण मनोगत
१. श्री. राकेश मोतीवाले – आजपर्यंत मी कधी न ऐकलेले विषय ऐकायला मिळाले. यापुढील काळात धर्मजागृतीसाठी प्रयत्न करीन.
२. श्री. श्रीगणेश देवरकोंडा – आजची कार्यशाळा हा प्रसाद आहे. ‘हा प्रसाद घेण्यासाठी माझे हात अपुरे आहेत’, असे वाटते. या कार्यशाळेतून ‘स्वयंपूर्ण कसे व्हायचे’, ते शिकायला मिळणार आहे.
३. श्री. नरेश गणुरे, सोलापूर – हिंदूंसाठी आणि धर्मासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. नेमकी दिशा मिळत नव्हती; मात्र समितीमुळे मार्ग मिळाला.
४. श्री. कृष्णाहरि क्यातम, सोलापूर – जेव्हापासून मला सनातन संस्थेचे मार्गदर्शन मिळाले तेव्हापासून आदर्श पुरोहित सेवा कशी करायची, हे समजले. धर्मकार्यात सहभाग हीच खरी पुरोहित सेवा आहे.
५. सोनम गोडसे – राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजामाता यांनी जन्म घेतलेल्या पवित्र भूमीत जन्म घेतल्याविषयी मला कृतज्ञता वाटते. स्वरक्षण प्रशिक्षण, राष्ट्र-धर्म जागृतीसाठी ज्या ज्या मोहिमा होतील त्यात सहभागी होऊन मी यापुढील काळात हिंदु युवतींना संघटित करून धर्मकार्यात सहभागी होईन.
६. श्री. विपुल अर्शिद – इथे आल्यावर व्यष्टी साधना समजली. पुढच्या काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान; म्हणून समष्टी साधना करण्यास प्राधान्य देईन.
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे सत्य चित्रण असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध का ? – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर – वर्ष १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर जे अनन्वित अत्याचार झाले ते ३२ वर्षांनंतर ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती वर्ष २००३ पासून या संदर्भात ‘फॅक्ट’ प्रदर्शनाद्वारे जागृती करत आहे. जो चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे, तो चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वीपासून त्याला विरोध चालू झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आतील आसंद्या रिकाम्या असतांना बाहेर ‘हाऊस फुल्ल’ असे फलक लावण्यात येत आहेत. याउलट ‘आश्रम’ या ‘बेव सिरीज’द्वारे हिंदु साधु-संत, आश्रम यांच्याविषयी संपूर्ण खोटी, आश्रम व्यवस्थेचा अपप्रचार करणार्या घटना दाखवलेल्या असतांना त्याला विनाअट अनुमती देण्यात येते. त्याला विरोध झाल्यावर त्याच्या चित्रीकरणासाठी पोलीस संरक्षण दिले जाते. त्यामुळे काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे सत्य चित्रण असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ दाखवण्यास विरोध का ? असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी उपस्थित केला. ते प्रथम सत्रात ‘हिंदु राष्ट्राची मुलभूत संकल्पना’ यावर बोलत होते.
श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, ‘‘या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांना प्रदर्शनाच्या अगोदरच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आपण स्वतंत्र झालो असे म्हणतो; मात्र अद्यापही आपण इंग्रजांच्या काळातील वर्ष १८६० च्या पोलीस कायद्यातील तरतुदी, तसेच महसूल विभागासाठी वर्ष १९०५ चा ‘रेव्हिन्यू ॲक्ट’मधीलच तरतुदी वापरतो. असे असेल, तर आपण स्वतंत्र झालो असे म्हणू शकतो का ? भारत सोडून अन्य कोणत्याही देशांमध्ये बहुसंख्य असलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म आचरण्यास कोणतीही आडकाठी आणली जात नाही. याउलट भारतात मात्र बहुसंख्य धर्मियांना त्यांना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते.’’
ज्यांच्यावरच अनेक गुन्हे नोंद आहेत, अशा लोकप्रतिनिधींकडून न्याय मिळण्याची काय अपेक्षा करणार ? – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात एकटी महिलाही रात्री-अपरात्री फिरू शकत होती. सध्या मात्र तशी स्थिती नाही. ज्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत, असे लोकप्रतिनिधी होत आहेत त्याही पुढे जाऊन मंत्रीपदही भूषवत आहेत. त्यामुळे ज्यांच्यावरच अनेक गुन्हे आहेत, अशा लोकप्रतिनिधींकडून न्याय मिळण्याची काय अपेक्षा करणार ? स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या देशात नक्षलवाद नव्हता याउलट आज २९ राज्यांपैकी २२ राज्यातील २३२ जिल्हे नक्षलवादग्रस्त आहेत. सध्याचे शासन दुकानांमध्ये मद्य मिळणार, असे सांगते. समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची चेतावणी दिल्यावर, तसेच समाजातून याला विरोध झाल्यावर शासन आम्ही लगेच निर्णय घेणार नाही, अशी सावध भूमिका घेते.
आर्ततेने केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत पोचतेच ! – पू. (कु.) दीपाली मतकर
प्रार्थना वरवर केली, तर ती भगवंतापर्यंत पोचत नाही. त्यासाठी प्रार्थना आर्ततेने करणे अपेक्षित आहे. प्रार्थना भावपूर्ण होण्यासाठी श्रीकृष्णाचे रूप अथवा गुरुदेवांचे रूप समोर आणून प्रार्थना केल्यास लवकर भावजागृती होती. प्रार्थना म्हणजे भगवंताशी अनुसंधान होय ! सकाळी उठल्यापासून आपण वेगवेगळ्या प्रार्थना करू शकतो. स्वत:च्या साधनेसाठीही अधिकाधिक भावपूर्ण प्रार्थना केल्यास त्याचा लाभ होतो, असे मार्गदर्शन पू. (कु.) दीपाली मतकर यांनी केले. त्या पहिल्या दिवशी तृतीय सत्रात ‘प्रार्थनेचे प्रयत्न’ याविषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर सौ. उल्का जठार आणि सौ. राजश्री देशमुख उपस्थित होत्या.
कार्यशाळेत पहिल्या दिवशीच्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी
१. दुसर्या सत्रात संपर्क कसा करावा ? पोलीस स्थानकात सभेची अनुमती काढणे, या विषयी प्रायोगिक भाग घेण्यात आला. यात उपस्थित धर्मप्रेमींनी व्यासपिठावर येऊन प्रत्यक्ष कृती करून दाखवली.
२. प्रत्यक्ष नामजप करणे आणि अनुभूती या सत्रात उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी नामजप झाल्यावर त्यांना आलेल्या विविध अनुभूती सांगिल्या.
३. स्वभावदोष निर्मूलन यावर श्रीमती अल्का व्हनमारे आणि श्री. दत्तात्रय पिसे यांनी माहिती दिली. श्री. दत्तात्रय पिसे यांनी स्वभावदोष सारणी कशी लिहावी ? यावर सविस्तर माहिती दिली. या सत्रानंतर बहुतांश सर्व धर्मप्रेमींनी आजपासून नियमितपणे स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
४. ‘हलाल’ विषयाच्या संदर्भात श्री. मनोज खाडये यांचे मार्गदर्शन झाल्यावर उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी ‘आजपासून हलाल प्रमाणपत्रावर बहिष्कार टाकत आहे’, असे उत्स्फूर्तपणे ‘हर हर महादेव’च्या गजरात सांगितले.
क्षणचित्रे
१. कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सोलापूर महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका सौ. राधिका पोसा यांनी प्रदर्शनस्थळी लावलेले सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन पाहिले. या वेळी त्यांच्या समवेत ‘हॅपी डेज प्री प्रायमरी स्कूल’च्या प्राचार्या सौ. अर्चना तांदळे, धर्मप्रेमी सौ. वर्षा देवरकोंडा, तसेच सौ. वनिता राजुळे उपस्थित होत्या.
२. कार्यशाळेच्या सभागृहात ‘हिंदूंनो, धर्मशिक्षणासाठी एक व्हा’, ‘हिदूंनो देवतांची विटंबना रोखा’, ‘परमेश्वरी अधिष्ठानाचे महत्त्व’ यांसह अन्य कापडी फलक लावण्यात आले आहेत.
विविध जिल्ह्यांमध्ये २२ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा निर्धार !या वेळी झालेल्या गटचर्चेत धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे येणार्या काही कालावधीतच सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, फलटण, बार्शी यांसह अन्य ठिकाणी २२ हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यात आयोजन, नियोजन, अनुमती, प्रसार यांसह सभेच्या संदर्भातील प्रत्येक सेवेचे दायित्व घेऊन सेवा करू, असे धर्मप्रेमींनी सांगितले. |