नवी देहली – चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. चीनमध्ये कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या प्रकाराचा उपप्रकार असणारा ‘बीए२’चा प्रसार वेगाने होत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला उपप्रकार आता चीन व्यतिरिक्त पश्चिम युरोपमध्येही पसरत आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचा असा दावा आहे की, ‘बीए२’चा प्रसार वेगाने होत आहे; पण तो घातक नाही. भारताच्या ‘कोरोना कृती दला’चे प्रमुख नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, भारतात ‘बीए २’ची प्रकरणे वाढण्याची शक्यता अल्प आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत भारतातील ७५ टक्के प्रकरणे ‘बीए २’चीच होती. त्यामुळे जून मासात कोरोनाची चौथी लाट येण्याच्या ‘आयआयटी कानपूर’ने व्यक्त केलेल्या अंदाजात फारसे तथ्य नाही.
देशात २४ घंट्यांत कोरोनाचे २ सहस्र ८७६ नवे रुग्ण
देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २ सहस्र ८७६ नवे रुग्ण आढळून आले, तर ३ सहस्र ८८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३२ सहस्र ८११ कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार चालू आहेत. आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ५० सहस्र ५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर कोरोनामुळे ५ लाख १६ सहस्र ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.