‘सर्वांची साधना व्हावी’, या तीव्र तळमळीमुळे अविरत सेवारत असणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये (वय ४४ वर्षे) !

आज होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

आज होळी पौर्णिमा (१७.३.२०२२). या दिवशी धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी सांगितलेली साधनेविषयीची अमूल्य सूत्रे पुढे दिली आहेत.

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘कोरोना महामारीमुळे चालू झालेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ नामसत्संग, भाववृद्धी सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आले होते. या सत्संगांमध्ये सहभागी होणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील धर्मप्रेमींना सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी) आधी ‘ऑनलाईन’ संपर्क केला होता. सद्गुरु स्वातीताईंनी या धर्मप्रेमींसह सोलापूर, लातूर, बीड, अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, धर्मकार्याची आवड असणारे उद्योजक आणि व्यापारी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. सद्गुरु स्वातीताईंनी या सर्वांना साधना आणि सत्सेवा यांविषयी मार्गदर्शन केले. सद्गुरु स्वातीताईंना जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना साधनेत पुढे घेऊन जाण्याची तळमळ असल्यामुळे त्या दीपावलीतील चारही दिवस ही सेवा करत होत्या. या भेटींच्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. सोलापूर जिल्ह्यातील जिज्ञासूंच्या घेतलेल्या भेटी

सद्गुरु स्वातीताईंनी जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशीही जवळीक निर्माण होऊन त्यांचे कुटुंबीयही साधना करू लागले आहेत.

१ अ. श्री. देवरकोंडा यांची भेट घेतल्यावर त्यांनी वसाहतीमध्ये ‘धर्मशिक्षणवर्ग’ आणि ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’ चालू करण्याची मागणी करणे : सद्गुरु स्वातीताईंनी सोलापूर येथील श्री. गणेश देवरकोंडा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तेव्हा श्री. देवरकोंडा यांनी त्यांच्या शेजारी रहाणार्‍या कुटुंबियांनाही बोलावले होते. सद्गुरु स्वातीताईंनी सर्वांना ‘साधना’ आणि ‘हलाल जिहाद’ याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनानंतर श्री. देवरकोंडा यांनी त्यांच्या वसाहतीमध्ये ‘धर्मशिक्षणवर्ग’ आणि ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’ चालू करण्याची मागणी केली.

पू. (कु.) दीपाली मतकर

१ अ १. वसाहतीतील महिलांना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी लघुग्रंथांची मागणी देणे : सद्गुरु स्वातीताईंनी त्यांच्या वसाहतीतील महिलांना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगितले आणि सनातनने प्रकाशित केलेले लघुग्रंथ वाण म्हणून देण्याविषयी सुचवले. त्यानुसार तेथील महिलांनी मकरसंक्रांतीसाठी सनातनच्या विविध लघुग्रंथांची मागणी दिली.

१ आ. सद्गुरु स्वातीताईंकडून ‘हलाल जिहाद’ याविषयी कळल्यावर श्री. ऋतुराज अर्सिद यांनी त्यांच्या नातेवाइकांना त्याविषयी सांगून जागृती करणे : सद्गुरु स्वातीताईंनी श्री. ऋतुराज अर्सिद यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेल्यावर त्यांच्या कुटुंबियांना (आई, दोन भाऊ, वहिनी यांना) ‘हलाल जिहाद’ हा विषय सांगितला. हा विषय ऐकल्यानंतर श्री. ऋतुराज अर्सिद यांनी ८ दिवसांत त्यांच्या १२ नातेवाइकांना एकत्र करून त्यांना ‘हलाल जिहाद’ आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी माहिती दिली. अर्सिद कुटुंबियांनी सद्गुरु स्वातीताईंशी मनमोकळेपणे बोलून त्यांचे मार्गदर्शन घेतले.

१ आ १. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्याप्रमाणे सौ. अश्विनी दासरी यांनी महिलांना एकत्र करून त्यांना दत्ताच्या नामजपाचे महत्त्व सांगणे आणि प्रवचनाचे आयोजन करणे : सद्गुरु स्वातीताईंनी सौ. अश्विनी दासरी यांची भेट घेतल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्यानुसार त्यांनी त्यांच्या परिसरातील महिला जिज्ञासूंना एकत्र करून त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करण्याचे महत्त्व तेलुगु भाषेत सांगितले आणि त्यांना प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करण्यास सांगितले. त्यांनी त्या महिलांसाठी एका प्रवचनाचे आयोजनही केले.

१ इ. सद्गुरु स्वातीताईंनी साधना सत्संगातील महिला जिज्ञासूंची भेट घेऊन त्यांची प्रेमाने विचारपूस करणे, त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे आणि त्यानंतर त्या महिलांचे साधनेचे प्रयत्न वाढणे : सद्गुरु स्वातीताईंनी सोलापूर येथील साधना सत्संग आणि धर्मशिक्षणवर्ग यांत सहभागी होणार्‍या महिला जिज्ञासूंची भेट घेतली. या सर्व महिला शिवणकाम करतात. सद्गुरु स्वातीताईंनी या महिलांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांची विचारपूस केली. सद्गुरु ताई त्यांच्या घरातील लहान मुलांशीही बोलल्या. सद्गुरु ताईंनी त्या सर्वांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनानंतर त्या महिलांचे साधनेचे प्रयत्न वाढले. त्यांची मुलेही नामजप आणि धर्माचरण करू लागली.

१ ई. सद्गुरु स्वातीताईंनी सोलापूर येथील धर्मप्रेमींच्या ३ गटांना एकत्र करून त्यांना ‘साधना आणि ‘हलाल जिहाद’ यांविषयी मार्गदर्शन करणे अन् त्यांच्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करणे : या धर्मप्रेमी मुलांनी सोलापूर येथील अन्य मुलांसाठीही नवीन स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचे नियोजन केले आहे. धर्मप्रेमी मुले सद्गुरु स्वातीताईंना म्हणाली, ‘‘आमच्यासाठी वर्ग चालू केला, तसा घरातील महिलांसाठीही एक वर्ग चालू करा.’’ त्यामुळे या ठिकाणी महिलांसाठी २ धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात येणार आहेत.

१ उ. सद्गुरु स्वातीताईंनी ‘सोलापूर जिल्ह्यातील बालसाधकांचे साधनेचे प्रयत्न चांगले व्हावेत’, यासाठी पालकांचा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होत असलेले बालसाधकांविषयीचे लेख वाचल्यानंतर ‘सोलापूर जिल्ह्यातील बालसाधकांसाठी सत्संग चालू करूया’, असा विचार करून सद्गुरु स्वातीताईंनी ‘दैवी बालसाधक आणि साधना करणारे ८ ते १४ वर्षे वयोगटातील बालसाधक यांचे साधनेचे चांगले प्रयत्न व्हावेत’, यासाठी त्यांच्या पालकांचा ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केला. या सत्संगामध्ये सद्गुरु स्वातीताईंनी ‘हे बालसाधक पुढे हिंदु राष्ट्र चालवणार आहेत. ‘त्यांना योग्य प्रकारे घडवणे’, ही आपली साधना आहे’, असे सांगून पालकांना बालसाधकांच्या साधनेत साहाय्य करण्यास सांगितले. त्यांनी बालसाधकांनाही साधनेचे प्रयत्न वाढवण्यास सांगितले. या सत्संगामुळे पालक आणि बालक यांचे साधनेचे प्रयत्न वाढले.

१ ऊ. सद्गुरु स्वातीताईंनी चालू केलेले अन्य सत्संग : सद्गुरु स्वातीताईंनी ‘सोलापूर जिल्ह्यातील युवा साधकांच्या साधनेची घडी बसावी’, यासाठी युवा साधकांसाठी प्रत्येक मंगळवारी सत्संग चालू केला. त्यांनी जिल्ह्यात स्वरक्षण प्रशिक्षण शिकवणार्‍या प्रशिक्षकांसाठीही एक सत्संग आणि साधकांसाठी प्रत्येक बुधवारी चित्तशुद्धी सत्संग चालू केला. त्यामुळे साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न चालू झाले.

१ ए. सद्गुरु स्वातीताईंनी जिज्ञासूंना साधनेविषयी केलेले सामायिक मार्गदर्शन !

१. घरातील त्रासदायक स्पंदने न्यून होण्यासाठी आणि साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी घरात ‘वास्तूछत’ (टीप) लावावे.

टीप – सनातन-निर्मित देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या विशिष्ट पद्धतीने लावणे

२. कुटुंबियांनी एकत्र बसून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप ३० मिनिटे करावा.

३. कुटुंबातील लहान मुलांनी सनातनच्या बालसंस्कारवर्गास उपस्थित रहावे.

४. कुटुंबातील तरुण मुलांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गांना उपस्थित रहावे.

या मार्गदर्शनानंतर अनेक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी ‘कुटुंबियांसह एकत्र बसून नामजप केल्यामुळे पुष्कळ लाभ झाला’, असे सांगितले. या संपर्कांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नव्याने ‘धर्मशिक्षणवर्ग’ चालू करण्यात आले.

२. लातूर येथील जिज्ञासूंच्या घेतलेल्या भेटी

२ अ. लातूर येथील जिज्ञासूंना ‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राविषयी सांगून त्यांच्यात जागृती करणे : सद्गुरु स्वातीताईंनी लातूर येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचा सत्संग घेतला. या सत्संगात सद्गुरु ताईंनी ‘हलाल जिहाद’ याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली. जिज्ञासूंनी ‘हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असून तो आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू’, असे सांगितले.

२ आ. लातूर येथे स्वतःच्या घरात सनातनचा आश्रम चालू करण्याची इच्छा व्यक्त करणारे श्री. आनंद अग्रवाल ! : लातूर येथील धर्मप्रेमी श्री. आनंद अग्रवाल यांचे ‘राजभोग’ नावाचे भोजनालय आहे. सद्गुरु ताईंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी सद्गुरु ताईंकडून ‘सनातनच्या आश्रमांतील दिनचर्या कशी असते ?’, याविषयी जाणून घेतले. आश्रमातील दिनचर्या ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘‘लातूर येथेही आश्रम चालू करावा. माझ्या घरात आश्रम चालू करता येईल का ? येथेही ‘सनातन संस्था’ अन् ‘हिंदु जनजागृती समिती’ यांचे कार्य वाढावे’, असे मला वाटते.’’ त्यांनी त्यांच्या एका मित्राला बोलावून सद्गुरु स्वातीताई सांगत असलेली साधनेविषयीची माहिती ऐकून घेऊन त्यानुसार कृती करण्याविषयीही सांगितले.

‘हे श्रीकृष्णा, तुझ्याच कृपेमुळे मी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या समवेत या दैवी दौर्‍यावर जाता आले. त्या वेळी केलेल्या सर्व संपर्कांना गुरुकृपेने अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तेव्हा ‘गुरुदेवांचे सर्व कार्य दैवी नियोजनानुसार चालू आहे’, असे मला अनुभवता आले.’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (२३.१२.२०२१)

वसुबारसेच्या आदल्या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी गोपूजन करण्याविषयी बोलणे आणि वसुबारसेच्या दिवशी मार्गदर्शनाच्या ठिकाणी त्यांच्या हस्ते गोपूजन होणे

‘दिवाळीच्या वेळी वसुबारसेच्या आदल्या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये गोपूजन करण्याविषयी बोलत होत्या. वसुबारसेच्या दिवशी एका श्रीकृष्ण मंदिरामध्ये सद्गुरु स्वातीताईंचे साधकांसाठी मार्गदर्शन होते. मंदिराच्या विश्वस्तांनी सद्गुरु स्वातीताईंच्या हस्ते गोपूजन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तिथे सद्गुरु ताईंच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. त्यानंतर विश्वस्तांनी श्रीकृष्ण मंदिरात सद्गुरु स्वातीताईंचा सन्मान केला आणि त्यांच्या हस्ते मंदिरातील आरती करण्यात आली. या प्रसंगामुळे ‘सद्गुरूंच्या मनात एखादा विचार आल्यानंतर त्यानुसार नियोजन कसे होते ?’, याची मला अनुभूती आली.’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (२३.१२.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक