नवाब मलिक यांची ‘ईडी’च्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली !

डावीकडून नवाब मलिक आणि मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिक यांचा दावा चुकीचा असल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. ईडीने केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. मलिक यांनी कारागृहातून त्यांची तात्काळ सुटका व्हावी, अशी मागणीही याचिकेद्वारे केली होती.

१. मलिक यांनी केलेल्या या याचिकेला विरोध करत ‘ईडी’ने त्यांच्याविरोधातील कारवाई आणि त्यांची अटक आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायद्याला अनुसरूनच असल्याचा दावा करत ही याचिका फेटाळून लावण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.

२. कुर्ला येथील एका भूमीच्या व्यवहाराचे थेट संबंध कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी असून मलिक यांनी या व्यवहारातून दाऊदला आर्थिक रसद पुरवल्याचे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, तसेच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ‘ईडी’ने म्हटले होते, तसेच अन्वेषण सध्या प्राथमिक अवस्थेत असल्याने ते थांबवणे योग्य ठरणार नाही, असेही ‘ईडी’ने उच्च न्यायालयात स्पष्ट केले होते.

३. न्यायालयाने म्हटले की, या याचिकेतून काही गंभीर सूत्रे उपस्थित करण्यात आली आहेत. त्यावर आम्हाला सविस्तर सुनावणी घ्यावी लागेल.