माझ्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाकारली ! – पंतप्रधान मोदी यांची घराणेशाहीवर टीका

भाजपची संसदीय बैठक

नवी देहली – घराणेशाही जपणारे (राजकीय) पक्ष देशाची हानी करत आहेत. आपण घराणेशाहीच्या विरोधात लढतो; म्हणून जनता आपल्या पाठीशी उभी रहाते. पक्षात घराणेशाही चालणार नाही. आपण इतर पक्षांमधील घराणेशाहीच्या विरोधात लढा देतो. त्याआधी आपल्याला आपल्या पक्षातील घराणेशाहीशी लढावे लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नेते आणि खासदार यांना बजावले. भाजपच्या संसदीय बैठकीला ते संबोधित करत होते. ‘भाजपच्या नेत्याच्या आणि खासदाराच्या कुटुंबियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे. जर हे पाप असेल, तर ते मी केले आहे. इतके असूनही तुम्ही आमच्यासमवेत आहात, यासाठी मी तुमचा आभारी आहे ’, असेही मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.

मयांक जोशी अखिलेश यादव आणि श्रीमती रिटा बहुगुणा जोशी

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या खासदार रिटा बहुगुणा जोशी त्यांच्या मुलाला तिकीट मिळावे, यासाठी आग्रही होत्या. रिटा बहुगुणा जोशी प्रयागराजच्या खासदार आहेत. मुलगा मयांक जोशी याला लक्ष्मणपुरी येथून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यानंतर मयांक जोशी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे रिटा बहुगुणा जोशी या काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्या आहेत.

जामनगरच्या राजाने पोलंडच्या लोकांना दिला होता आश्रय !

या वेळी पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, जामनगरच्या राजाने दुसर्‍या महायुद्धात पोलंडच्या लोकांना आश्रय दिला होता. त्यामुळे पोलंडने युक्रेनमधील आमच्या विद्यार्थ्यांना साहाय्य केले.