|
नवी देहली – जर पक्षाला वाटत असेल, तर आम्ही तिघेही, म्हणजे मी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा हे आपापल्या पदांचे त्यागपत्र देण्यास सिद्ध आहोत, असे विधान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत केले. तथापि समितीने एकमताने यास नकार दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवावर आत्मचिंतन करण्यासाठी ही बैठक १३ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीविषयी काँग्रेसने एक प्रसिद्धीपत्रक प्रसारित केले आहे. यात म्हटले आहे की, ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा काँग्रेससाठी एक गंभीर चिंतनाचा विषय आहे. आमच्या रणनीतीमध्ये काही त्रुटी होत्या. त्यामुळे भाजपचा ४ राज्यांतील विजयरथ रोखण्यात आम्हाला अपयश आले. पंजाबमध्ये नेतृत्वात पालट केल्यानंतर सरकारविरोधी लाटांवरही आम्हाला नियंत्रण मिळवता आले नाही.