युद्ध चालू आहे !

‘शत्रूला नामोहरम कसे करायचे’, हे भारताने रशियाच्या डावपेचांतून शिकावे !

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला १९ दिवस उलटून गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या ४ फेर्‍या झाल्या आहेत. ज्या सूत्रावरून हे युद्ध चालू झाले आहे, त्या ‘युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊ नये’, या सूत्रावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी माघार घेण्याचे मान्य केले असले, तरी युद्ध थांबलेले नाही. उलट रशियाने आक्रमणाची प्रखरता अधिक वाढवली आहे. रशियाकडून आता सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. शाळा आणि रुग्णालये यांवरही बाँबवर्षाव करण्यात येत आहे. दुसरीकडे नाटो देश आणि अमेरिका रशियावर निर्बंधांवर निर्बंध लावत आहेत. आज रशिया हा जगातील सर्वाधिक निर्बंध असणारा देश झाला आहे. यापूर्वी उत्तर कोरिया आणि इराण यांच्यावर निर्बंध होते. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियावर बहिष्कार घालून तेथील त्यांचा व्यवसाय बंद केला आहे. रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यात येत असली, तरी रशिया युद्ध थांबवण्यास सिद्ध नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी ‘आम्ही चर्चेसाठी सिद्ध आहोत; मात्र रशियाने युद्धविराम करावा’, असे म्हटले आहे. रशियाला ते मान्य नाही. त्यामुळे ‘हे युद्ध थांबणार आहे कि नाही?’, असा प्रश्न सर्वच स्तरांत निर्माण झाला आहे. ‘२-३ दिवसांत युक्रेन शरणागती पत्करील’, असा रशियाचा या युद्धामागे होरा होता’, असे तज्ञांकडून सांगितले जात होते; मात्र ‘युक्रेनने लढाऊ बाणा दाखवत युद्ध २० व्या दिवसापर्यंत ताणून नेल्याने रशिया आता वेगळी चाल खेळत आहे’, असे म्हटले जात आहे. ही चाल पुढे तिसर्‍या महायुद्धाकडे नेणारी ठरू शकते, असे लक्षात येते. रशियावर आता जगभरातून निर्बंध लादले गेल्याने त्याची प्रचंड आर्थिक हानी होऊ लागली आहे. ‘जर आपली हानी होणार असेल, तर ती नाटो आणि अमेरिका यांचीही झाली पाहिजे’, असे आता रशिया म्हणजेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन विचार करू लागले आहेत’, असे तज्ञांकडून सांगितले जात आहे. अमेरिका आणि नाटो देश युद्धात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच घोषित केले आहे. ‘अन्य कोणताही देश या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उतरला, तर त्याला आम्ही सोडणार नाही’, असे पुतिन यांनी यापूर्वीच सांगितलेले आहे. ‘अमेरिका आणि नाटो हे युद्धात सहभागी नसले, तरी त्यांना कसे जेरीस आणायचे ?’ हेच डावपेच पुतिन यांनी आखले आहेत. ‘रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यामागे नाटो आणि अमेरिकाच उत्तरदायी आहे’, असे रशियाचे ठाम मत आहे. यामुळे ‘त्यांना या युद्धाची झळ पोचली पाहिजे’, असेच रशियाला वाटत आहे. वर्ष २०१४ मध्ये अमेरिकेने युक्रेनमधील रशियाधार्जिणे सरकार कोसळवून तेथे अमेरिका समर्थक सरकार स्थापन केले. त्यामुळे रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, याचा रशियाला राग आहे. यावरून नाटो आणि अमेरिका यांना धडा शिकवण्याची रशियाची इच्छा आहे. याचाच भाग म्हणून रशियाने युक्रेनची राजधानी कीववर नियंत्रण मिळवण्यात स्वतःहूनच विलंब करण्यास चालू केला आहे. रशिया कीववर लगेच नियंत्रण मिळवू शकत असला, तरी तो ते टाळत आहे. रशियाने अद्याप त्याच्या वायूदलाचा हवा तसा वापर केलेला नाही आणि नौदलाला अद्याप या युद्धात सहभागी करून घेतलेले नाही. काही क्षेपणास्त्रे आणि रणगाडे यांच्या साहाय्यानेच रशिया युद्ध चालू ठेवत आहे. हे युद्ध अधिकाधिक काळ चालू ठेवण्याचा पुतिन यांचा उद्देश आहे.

‘इंधना’च्या सूत्रावरून रशियाचे डावपेच !

‘पुतिन यांचे युद्ध अधिक काळ चालू ठेवण्यामागे पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांचे राजकारण आहे’, असे म्हटले जात आहे. अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यानंतर रशिया हा जगातील तिसरा इंधन पुरवठा करणारा मोठा देश आहे. युरोपला रशियाकडून मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा केला जातो. आता युद्धामुळे हा पुरवठा थांबलेला आहे. याचा परिणाम म्हणजे युरोपमधील इंधन आणि गॅस यांचे दर प्रचंड वाढले आहेत. सौदी अरेबिया आणि अमेरिका यांना कितीही वाटले, तरी त्यांना युरोपला इंधन पुरवठा करण्यास भौगोलिक परिस्थितीमुळे शक्य होणार नाही. तसेच उत्पादन वाढवणेही शक्य नाही, हेच रशिया ओळखून आहे.

रशियाकडे इंधन आणि गॅस हे हुकूमाचे एक्के आहेत !

‘रशियाकडून इंधन खरेदी करू नये’, असे अमेरिकेने म्हटल्यावर रशियानेही प्रत्युत्तर देत ‘आम्हाला काहीच फरक पडत नाही. उलट यामुळे जागतिक पातळीवर तेलाचे भाव वाढतील’, असे म्हटले. हे सत्यच आहे की, रशियावर तसा काही परिणाम होणार नाही. रशियाच्या या इंधनाला पर्याय म्हणून अमेरिकेने इराण आणि व्हेनेझुएला यांच्यावरील तेल विक्रीविषयीचे निर्बंध हटवले आहेत; मात्र त्यांच्याकडील तेलामुळे पुष्कळ काही परिणाम होण्याची शक्यता अल्प आहे. अमेरिकेने कितीही प्रयत्न केले, तरी इंधनाचे वाढलेले दर अल्प होऊ शकत नाहीत. याचाच परिणाम म्हणून युरोपीय देश आता अमेरिकेवर दबाव निर्माण करू लागले आहेत. ‘सर्व सोंगे आणता येतात; मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही’, अशी म्हण आहे; मात्र सध्या ‘सर्व सोंगे आणता येतात; मात्र इंधनाचे सोंग आणता येत नाही’, अशी नवी म्हण निर्माण व्हावी, अशी परिस्थिती युरोपीय देशांची झालेली आहे. त्यामुळे या देशांना येत्या काही दिवसांत अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाला शरण जावे लागल्यास आश्चर्य वाटू नये. रशिया याचीच वाट पहात आहे आणि तो युद्ध आणखी पुढे नेत आहे. रशियाला खरेच युद्ध संपवायचे असते, तर त्याने सर्वशक्तीनिशी युक्रेनवर प्रहार केला असता; मात्र तसे त्याने अद्याप एकदाही केलेले नाही आणि हेच रशियाचे धोरण आहे, हे लक्षात घ्यायला हवे. जागतिक स्तरावरून कितीही निर्बंध घातले गेले, तरी त्याचा रशियावर किती परिणाम होणार आणि युरोपीय अन् अन्य काही देशांवर किती होणार, याचे गणित मांडण्याची आवश्यकता आहे. रशिया या निर्बंधांवर काही बोलत नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. भारताने पोखरणमध्ये दुसर्‍यांदा अणूबाँबचे परीक्षण केल्यावर जगाने भारतावर, विशेष करून अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घातले; मात्र त्याचा भारतावर विशेष काही परिणाम झाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. तसेच रशियाचे झाल्यास आश्चर्य वाटू नये. रशियाकडे इंधन आणि गॅस हे हुकूमाचे एक्के आहेत. त्यांच्या बळावरच रशिया अमेरिका आणि युरोप यांना खेळवणार आहे, हे नक्की !