देवासाठी तरी हे हत्याकांड थांबवा ! – पोप फ्रान्सिस

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पोप यांची भावनिक साद !

पोप फ्रान्सिस

रोम – पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला. ‘मुलांच्या रुग्णालयांवर आणि नागरी ठिकाणांवर बाँब फेकणे, हे रानटी कृत्य आहे. देवासाठी तरी हे हत्याकांड थांबवा’, अशी भावनिक साद पोप फ्रान्सिस यांनी रशियाला घातली.

रशिया आणि युक्रेन यांच्या सैन्यांमध्ये सलग १८ व्या दिवशी संघर्ष चालू असतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पोप पुढे म्हणाले, ‘‘युक्रेनमधील शहरे स्मशानभूमीत रूपांतरित होण्याचा धोका आहे.’’ रशियाला युक्रेनवरील आक्रमण ताबडतोब थांबवण्याचे पोप यांनी केलेले हे सलग दुसरे आवाहन आहे. त्यांनी या आक्रमणाला ‘सशस्त्र आक्रमण’ असे संबोधले आहे. ‘युक्रेनमध्ये रक्त आणि अश्रू यांच्या नद्या वहात आहेत. ही केवळ सैनिकी कारवाई नाही, तर एक युद्ध आहे, जे आपल्याला मृत्यू, विनाश आणि दुःख या दिशेने नेत आहे’, असे ते म्हणाले होते.