पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला तिन्ही सैन्यदलांच्या शस्त्रसज्जतेचा आढावा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सुरक्षाविषयक मंत्री समिती’ची बैठक घेताना

नवी देहली – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जता आणि जागतिक परिस्थिती यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्चला ‘सुरक्षाविषयक मंत्री समिती’ची (‘सीसीएस्’ची) बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या शत्रसज्जतेचा आढावा घेण्यासह युक्रेनमधून भारतियांना मायदेशी आणण्यासाठी चालू केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’च्या संदर्भातही सविस्तर माहिती घेतली. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन्, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

जगभरातील देशांमध्ये संरक्षण क्षेत्रात सध्या कोणते तंत्रज्ञान वापरले जात आहे, याची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याखेरीज युक्रेनमधील घडामोडींसह ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत चालू असणार्‍या कामाचा तपशीलही पंतप्रधानांना देण्यात आला. यावर पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण यंत्रणेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर दिला, तसेच देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सुतोवच केले. युक्रेनमधील युद्धात मरण पावलेल्या कर्नाटकमधील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्यांचे पार्थिव मायदेशी आणण्याच्या संदर्भात सर्व प्रयत्न करून त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरता पोलंडमध्ये हलवला

युक्रेनमधील परिस्थिती लक्षात घेऊन भारताने युक्रेनमधील दूतावास तात्पुरता पोलंडला हलवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली. पुढील परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.