|
कोल्हापूर, १३ मार्च (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर, तसेच श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिर प्रवेशासाठी ‘ई-पास’ची सक्ती रहित करावी, तसेच श्री जोतिबा देवस्थान येथील चारही द्वारे भाविकांसाठी खुली करावीत, या मागण्यांसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्चपासून धरणे आंदोलन चालू करण्यात आले होते. या आंदोलनात हक्कदार पुजारी, गुरव समाज आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. १२ मार्च या दिवशी या आंदोलनास हिंदु जनजागृती समितीसह कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही आंदोलनाची चेतावणी दिली होती. अखेर या आंदोलनाच्या रेट्यामुळे श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील ‘ई-पास’ची सक्ती रहित करण्यात आली असून श्री जोतिबा देवस्थान येथील सर्व द्वारेही भाविकांसाठी खुली करणार असल्याचे देवस्थान समितीने घोषित केले आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने श्री. शिवानंद स्वामी यांनी दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत असल्याने पुढील काळात तरी मंदिर प्रशासनाने भाविकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.